संत मुक्ताई पालखीचे 18 जूनला प्रस्थान
14 जुलैला पंढरपूरला पोहोचणार : वारकर्यांना आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध
मुक्ताईनगर : खान्देशातील वारकर्यांना आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध लागले आहे. त्यासाठी खान्देशातून जे प्रमुख पायी दिंडी सोहळे पंढरपूरला जातात, त्यात मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळा राज्यभर मानाचे स्थान असलेला आहे. यंदा सोहळ्याचे 315 वे वर्ष असून तो मंगळवार, 18 जून रोजी दुपारी एक वाजता कोथळी येथील संत मुक्ताई समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने निघेल. 27 दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा 14 जुलैला पंढरपुरात दाखल होईल. संत मुक्ताईंचा हा पालखी सोहळा तापी तीरावरून भीमातीरी जातो.
600 किलोमीटरचा पायी प्रवास
संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर या सहा जिल्ह्यांमधून प्रवास करतो. 600 किलोमीटर इतका सर्वात लांब प्रवास करून आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे. त्यात हजारो वारकरी व अनेक दिंड्या सहभागी होतात. गतवर्षी ही संख्या पंधरा दिंड्या व पंधराशे वारकरी अशी होती. यंदा दोन हजारांवर वारकरी सहभागी होऊ शकतात. सोहळ्याच्या 27 दिवसांच्या प्रवासात वारकर्यांची भोजन, चहा-नाश्त्याची सोय हे दुपारचे थांबे असलेली गावे व रात्री मुक्कामाची गावे करतात.


21 रोजी पालखी परतीच्या प्रवासाला निघणार
आषाढी वारीत सहभागाचे आवाहन मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराजांनी केले आहे. सोहळा पंढरपूर येथे पोहोचल्यावर संत नामदेव महाराज आजे गुरू संत मुक्ताई पालखी सोहळा भेट, संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान, पंढरपूर प्रवेश होतो. नंतर 16 जुलैला संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या पालखी सोहळा भेटी वाखरी येथे होतील. यानंतर पंढरपुरात मुक्काम करून 21 जुलैला संत मुक्ताई पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गाला निघेल. 10 ऑगस्टला सोहळा मुक्ताईनगर येथे पोहोचेल. या दिवशी नवीन मंदिर ते कोथळी मंदिरापर्यंत दिंडी स्पर्धा होईल.
परतीच्या प्रवासात मुक्कामाची गावे
परतीच्या प्रवासात पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम रोपडे येथे होईल. यानंतर अनुक्रमे उपळाई, वाकडी फाटा, वांगी, सरमकुंडी फाटा, रौळसगाव, बीड शाहूनगर, रांजणी, खामगाव, डावरगाव, काजळा फाटा, कुंभेफळ, आळंद फाटा, मेरा खुर्द, बेराळा, केळवद, वाघजाळ फाटा, घुसर, धरणगाव, मुक्ताईनगरातील नवीन मंदिर आणि तेथून कोथळीतील मूळ मंदिर असा प्रवास होईल. आदिशक्ती संत मुक्ताईची नवीन मंदिरातील सुंदर मूर्ती. येथे होईल मुक्काम मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात पहिला मुक्काम होईल. यानंतर अनुक्रमे मलकापूर, मोताळा, बुलडाणा, येळगाव, चिखली, भरोसा फाटा, देऊळगाव मही, देऊळगाव राजा, जालना, काजळा फाटा, अंबड, वडीगोद्री, गेवराई, पाडळशिंगी, बीड माळीवेस, बीड बालाजी मंदिर, वानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टीचा मुक्काम. नंतर पंढरपूर.