संसारात राहात असतांना सुध्दा अनासक्त राहण्याचा प्रयत्न करावा : आचार्य महाश्रमण महाराज
भुसावळ : संसारात असतांना सुध्दा माणसाने अनासक्त रहायला शिकावे, मोह, माया, लोभ, मत्सर, द्वेष सोडावा, यातून सुध्दा आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. यासाठी अनासक्त राहून पहावे, असे प्रतिपादन आचार्य महाश्रमण महाराज यांनी येथे केले. शहरातील संतोषी माता हॉलमध्ये शनिवारी आयोजीत प्रवचनात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेने वेधले लक्ष
शनिवारी सकाळी आठ वाजता आचार्य महाश्रमण महराज यांचे कुर्हेपानाचे येथून जामनेर रोडवरील बियाणी पब्लिक स्कूलजवळ आले. तेथून त्यांची शोभायात्रा सकाळी आठ वाजता काढण्यात आली होती. ही शोभायात्रा 9 वाजता तेरापंथ भवनात दाखल झाली. जामनेर रोडने आलेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. शहरासह परिसरातील गावामधून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थिती होते.


शहरातील संतोषी माता हॉलमध्ये आयोजीत केलेल्या प्रवचनाच्या कार्यक्रमात बोलतांना आचार्य महाश्रवण यांनी सांगितले की, संसार करत असतांना आपण अनासक्त रहावे यासाठी त्यांनी मातीच्या गोळ्याचे उदाहरण देत सांगितले की, आपण मातीचा एक कोरडा व दुसरा ओला गोळा भिंतीवर मारतो, ज्यावेळी आपण तो गोळा काढतो त्यावेळी ओल्या गोळ्याचे तेथे चिन्ह उमटते तर कोरडा गोळा तसाच निघून जातो. जीवनात सुध्दा आपण असेच वागून रहावे. जीवनात माणसाने अनासक्त रहावे. यावेळी स्वाध्वी विस्तृत विभा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भुसावळमधील तीन जणांनी यापूर्वीच दिक्षा घेतली आहे, त्यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. यात देवमार्य मुनी, सिध्द मुनी आणि साध्वी सन्मती प्रभा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी गुरूकडून कसे शिकायला मिळाले याची माहिती दिली. रविवारी सकाळी आचार्य हे नशिराबादकडे रवाना झाले.
स्वागत गीत सादर
संतोषी माता हॉलमध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात स्वागत गीत सादर करण्यात आले. यावेळी तेरापंथ महिला मंडळातर्फे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी तेरापंथ युवक परिषदेतर्फे नाटिका सादर करण्यात आली तसेच दुपारी तेरापंथ दर्शन यावर कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.
खान्देशातून प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांची उपस्थिती
आचार्य शहरात येणार असल्याने शुक्रवारी शहरात विविध भागात महाराजांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले. आचार्य महाश्रमण यांनी आतापर्यत 55 हजार किमी अंतर पायी प्रवास केला आहे. त्यांनी नेपाळ, भुतान, भारत या देशात व 23 राज्यांमध्ये पायी पदयात्रेद्वारे प्रवास केला आहे. रात्री 8 वाजेपासून महाराजांचे दर्शन भाविकांनी घेतले. प्रवचन ऐकण्यास जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पिंपळनेर, कुर्हापानाचे, लोहारा, म्हसावद, मनमाड, दीपनगर, धुळे, दोंडाईचा, शहादा येथून भाविक आले होते.