वरणगाव नगरपरिषद वार्‍यावर ; मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्ती द्या

शिवसेनेची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी


वरणगाव : शहरात नागरिकांना 15 ते 20 दिवसाने पिण्याचे पाणी मिळत असून नवीन 25 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. घंटा गाडी नियमित वॉर्डात यावी तसेच मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करा अशा समस्यांसंदर्भात चर्चा करून शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शनिवार, 15 रोजी पाळधी येथे निवेदन देण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलून वरणगावच्या समस्या तत्काळ सोडवून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने
पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगाव येथील नवीन 25 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. वरणगाव शहरात 15 ते 20 दिवसांनी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. हतनूर धरणात पाणीसाठा असतानाही वरणगावला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळते. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास नागरिकांना सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा होईल. मुख्याधिकारी सुट्टीवर गेले असून वरणगाव शहरात पिण्याच्या पाण्याचे तसेच स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. याकडे कोणीही लक्ष द्यायला प्रशासन तयार नाही. या सर्व समस्या आपण त्वरित सोडाव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनातून ददेण्यात आला. निवेदन देताना विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख विकास पाटील, तालुका संघटक सुरेश चौधरी, युवा सेनेचे राहुल वंजारी, सुनील देवघटोले, सागर वंजारी यांची उपस्थिती होती.



नवीन अधिकारी जनार्दन पवार हजर
वरणगावातील समस्या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर वरणगाव येथे जनार्दन पवार हे अधिकारी नियुक्त झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !