आदिशक्ती मुक्ताई आज पंढरपूरच्या विठूरायाच्या भेटीला

यंदा सोहळ्याचे 315 वे वर्ष : 14 जुलै रोजी पंढरपूरात पालखी दाखल होणार


राजेश चौधरी
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताबाई पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीला मंगळवार, 18 रोजी दुपारी एक वाजता रवाना होत आहे. पालखी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे दीड हजार वारकरी पांडुरंगाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. पालखी प्रस्थानची सर्व तयारी संस्थानकडून पूर्ण झाली आहे. मुक्ताईच्या पादुका असलेल्या रथासाठी मानाची बैलजोडी म्हणून नाचणखेडा जि.बर्‍हााणपूर (म.प्र.) येथील मुक्ताई मंदिरात 17 रोजी दाखल झाली. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याला राज्यभर मानाचे स्थान आहे. यंदा सोहळ्याचे 315 वे वर्ष असून तो मंगळवार, 18 जून रोजी दुपारी एक वाजता कोथळी येथील संत मुक्ताई समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने निघेल. 27 दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा 14 जुलैला पंढरपुरात दाखल होईल. संत मुक्ताईंचा हा पालखी सोहळा तापी तीरावरून भीमातीरी जातो.

315 वर्षांची वैभवशाली परंपरा
315 वर्षांची वैभवशाली परंपरा राज्यातील सर्वच दिंड्यांपेक्षा जास्त अंतर म्हणजेच 600 कि.मी अंतर व 25 मुक्काम असलेली ही एकमेव दिंडी असल्याने मुक्ताई दिंडीचे महत्त्व आहे. मंगळवारी सकाळीच संस्थानतर्फे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील अभिषेक करतील तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्याहस्ते पादुका पूजन होईल.



नाचणखेडा येथील बैलजोडीला मान
बर्‍हाणपूर जिल्ह्यातील नाचणखेडा या गावातून राजेश प्रकाश पाटील यांची बैलजोडी रथासाठी मुक्ताई संस्थानात सोमवार, 17 जून रोजी दाखल झाली. गेल्या 11 वर्षांपासून राजेश प्रकाश पाटील यांच्या जोडीला हा मान मिळत आहे. विशेष म्हणजे या बैलजोडीची नाचणखेडा गावात सोमवारी सकाळी विधीवत पूजा करून सवाद्य मिरवणूक काढून मुक्ताईनगरला रवानगी करण्यात आली. राजेश पाटील पूर्ण वर्षभर या बैलजोडीचा उपयोग केवळ धार्मिक कार्य व मुक्ताई रथासाठीच करतात.

विधीवत पूजेनंतर पालखी होणार मार्गस्थ
मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जुन्या मंदिरातील मुक्ताबाई यांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून पादुका विधीवत पालखीत ठेवण्यात येतील. त्यानंतर भजनी मंडळ व वारकर्‍यांच्या अभंग गायनाने पालखी मार्गस्थ होईल. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर जुन्या प्रवर्तन चौकमार्गे नवीन गावातून पालखी नवीन मुक्ताई मंदिरात येईल. त्या ठिकाणीदेखील पादुकांना मुक्ताई चरणी ठेवून विधीवत पूजा करून रथात ठेवल्यानंतर पालखी मलकापूरकडे रवाना होईल.

9 नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका
श्री संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये आता मोठे बदल व परिवर्तन झालेले आहे. पूर्वी पालखी खांद्यावर नेली जात होती मात्र त्यावेळी पितळी पालखी व पादुका होत्या. नंतर बैलगाडीतून पादुका व रथ नेला जात होता. यंदा प्रथमच लोकसभागातून अंदाजे नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका पालखी सोहळा रथासोबत पंढरपूरला जात आहेत तसेच चोपदाराची काठी चांदीची असणार आहे. आता प्रत्येकाला आषाढी वारीचे वेध लागले आहे. मानाची व सन्मानाची पालखीला 315 वर्षाचा प्रदीर्घ काळ होत आहे. सहा जिल्ह्यातून पालखीचा प्रवास आहे. जुने मंदिर ते नवीन मंदिरापर्यंत प्रत्येकाने वारीत प्रस्थानाच्या वेळी सहभागी व्हावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र हरणे महाराज यांनी केले आहे.

अधिकार्‍यांकडून पाहणी
मागण्यांच्या आधारे नियोजन करण्यासाठी अधिकार्‍यांनी जुने मुक्ताई मंदिर कोथळी या ठिकाणी दोन दिवस अगोदर जाऊन पाहणी करून पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांच्यासोबत चर्चा केली. पाहणी दौर्‍याच्या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, भुसावळ प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, नायब तहसीलदार निकेतन वाळे, गटविकास अधिकारी निशा जाधव, महावितरणचे अभियंता ज्ञानेश्वर ढोले आदी अधिकारी, कर्मचारी तसेच काही भाविकही उपस्थित होते.

शासनाकडून दोन कोटींचा निधी
पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीला जात असलेल्या मानाच्या सात पालखी सोहळ्याला राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती मूळ मुक्ताई मंदिर कोथळी येथील व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !