भुसावळातील साईचंद्र नगरातून दुचाकी लंपास
भुसावळ : भुसावळ शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगरात चोरट्यांनी दुचाकी लांबवताना रहिवाशांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. हा प्रकार मंगळवार, 18 रोजी पहाटे उघडकीस आला होता. याप्रकरणी गुरुवारी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरांना कड्या लावत केली चोरी
शुभम दिलीप व्यास (23, साईचंद्र नगर, पद्मा रेसीडेन्सी, भुसावळ) यांनी दिलेल तक्रारीनुसार, मंगळवार, 18 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.जी.9265) लांबवली. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुचाकी चोरी करताना साईचंद्र नगर परिसरातून चोरलेल्या दोन दुचाकी पद्मा रेसीडेन्सीबाहेर आणून सोडल्या तर व्यास यांची महागडी दुचाकी लांबवली. शहर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर त्यात तीन चोरटे कैद झाल्याचे स्पष्ट झाले असून चोरट्यांची ओळख पटवली जात आहे. रेकी करून चोरटे चोरी करीत असल्याचा संशय आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद सपकाळे करीत आहेत.

