पावसाळ्यात मुख्यालय सोडू नका : भुसावळ तहसीलदारांच्या तलाठ्यांना सूचना
भुसावळ : पावसाळ्याच्या दिवसात तलाठ्यांनी त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सोडू नये, पावसाने कुठे नुकसान झाले असल्यास तेथे जाऊन तात्काळ पंचनामे करावे आणि त्याचे अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवावे, अश्या सूचना तहसीलदार निता लबडे यांनी दिल्या. भुसावळ तहसील कार्यालयात तालुक्यातील तलाठी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार लबडे यांनी सूचना दिल्या.
ई चावडीतून करा काम
यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक तलाठी यांनी ई-चावडीतून कामे करावे, थकबाकीच्या कामाला सुध्दा चालना द्यावी, पावसाळ्याच्या दिवसात सर्व तलाठी यांनी त्यांच्या नेमणूकीच्या ठिकाणीच थांबावे, पावसाळ्याच्या दिवसात पावसाने जर कुठे नुकसान झाल्यास तलाठ्यांनी तत्काळ पंचमाने करून त्याचा अहवाल हा तहसील कार्यालयात सादर करावा. पूर्व परवानगीशिवाय कुणीही नेमणुकीचे ठिकाण सोडून जाऊ नये. नुकसानीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल हा तहसील कार्यालयात जमा करावा. अश्या सूचना तहसीलदार निता लबडे यांनी केल्यात. यावेळी तालुक्यातील सर्वच तलाठी व अन्य कर्मचारी यांची उपस्थिती होती.

