विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे : महेश वाघमोडे

व्हाईस ऑफ मिडीयातर्फे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव


भुसावळ : विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची निवड करण्यापूर्वी आधी आपले ध्येय निश्चित करावे, असे मत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी व्यक्त केले. ते व्हाईस ऑफ मिडीयाच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित तालुक्यातील पत्रकारांच्या दहावी, बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत पाल्यांच्या गौरव समारंभात बोलत होते.

पंचायत समिती सभागृहात झालेल्या समारंभात व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितांमध्ये भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजु फालक, वेलनेस फाऊंडेशनचे संचालक निलेश गोरे, शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.नितीन खरे, समुपदेशक आरती चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, जिल्हा प्रवक्ते संजयसिंग चव्हाण उपस्थित होते.


उपलब्ध संधीचा करावा अभ्यास : वाघमोडे
वाघमोडे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी शॉर्ट एनालिसिसच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बाजू आपल्या व्यक्तिमत्वातील कमतरता तसेच उपलब्ध असलेल्या संधी यांचा अभ्यास करावा व त्यानुसार आपले ध्येय निश्चित करावे. सध्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. रोजनिशी लिहुन स्वतचे आत्मपरीक्षण करावे म्हणजे आपला विकास योग्य दिशेने होत आहे का हे आपल्या लक्षात येते, असेही वाघमोडे म्हणाले.

आवडीचे विषय निवडीचे स्वातंत्र्य : प्राचार्य फालक
डॉ.आर.पी.फालक म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणात अनेक बदल होत भावी जीवनात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. निलेश गोरे म्हणाले कोणते कॉलेज निवडावे यापेक्षा तेथील नॉलेजनुसार कॉलेज निवडावे. कोणी सांगितले म्हणून कोणत्याही मार्गावर जाऊ नका, बुद्धी बरोबर शारीरिक विकासाकडे सुद्धा लक्ष द्या. स्वतः मध्ये कौशल्य विकसीत करा तरच आधुनिक जगात तुमचा निभाव लागेल. पत्रकार शेखर पाटील म्हणाले शिकत असताना स्वतः ला अपडेट करत रहा, पालकांनी अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकु नये. आरती चौधरी, अ‍ॅड.नितीन खरे यांचीही यावेळी भाषणे झाली.

गुणवंत पाल्यांचा सत्कार
याप्रसंगी ग्रीष्मा चव्हाण, समीक्षा आराक, विजय वाघ, अक्षरा पाचपोळ, तेजस तायडे, वरद नेमाडे, तेजांश काळे, लावण्या शेलोडे, वैभवी कांबळे, तनिषा तायडे, रेणुका चौधरी या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र व रोप देऊन गौरव करण्यात आला. शाल, रोप व पुस्तक देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुकाध्यक्ष उज्वला बागुल यांनी प्रास्ताविक केले. राजश्री देशमुख यांनी सूत्रसंचलन तर सुनील आराक यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी ज्येष्ठ पत्रकार दीपक चांदवाणी, व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुका सचिव सुनील आराक, उपाध्यक्ष संतोष शेलोडे, कलीम पायलट, सतीश कांबळे, प्रेम परदेशी, नाना पाटील, अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, विनोद गोरधे, इकबाल खान, आकाश ढाके, कमलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !