तासखेडा येथे वीज चोरी : चौघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल
यावल : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या थोरगव्हाण कक्षा अंतर्गत येणार्या तासखेडा या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये गावात चार जण वीज चोरी करताना आढळले. चौघांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार त्यांना दंडाची रक्कम आकारणी करून नोटीस देण्यात आली मात्र, या चौघांनी वेळेत दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी चार जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सावदा पोलिसात गुन्हा दाखल
राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सावदा उपविभाग अंतर्गत थोरगव्हाण कक्ष आहे. या कक्षाचे सहाय्यक अभियंता योगेश चौधरी यांच्या सहपथकाने तासखेडा, ता.रावेर या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये त्यांना सोनलाल देवचंद कुंभार, धनराज गोंडू कोळी, अजय समाधान कोळी व सगुणबाई चिंधु कुंभार हे चार जण वीज चोरी करतांना मिळून आले. या चौघांनी प्रत्येकी 150 हून अधिक युनिट वीज चोरी केली होती. चौघांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंड आकारणी व तडजोड रक्कम दोन हजार रुपये अशी आकारणी करून नोटीस बजावण्यात आली मात्र या चौघांनी वेळेत दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता योगेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून चार जणाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी हा गुन्हा सावदा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आहे.

