ट्रेंडींगच्या नावाखाली व्यापार्याला सहा लाखांचा गंडा : दिल्लीतील ठग जळगाव सायबर पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : ट्रेडींगच्या आमिषाने व्यापार्याची सुमारे सहा लाखात फसवणूक करण्यात आली होती. जळगाव सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्लीतील दोन ठगांना बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत सिंग मदन कुमार (43, रा.जहांगीरपुरा, दिल्ली) व प्रवीण कुमार बीरेंद्र शाही (44, रा.द्वारका सेक्टर-19, दक्षिण दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील हेमेंद्र राजेंद्र शर्मा (वय 56 वर्ष, रा. जय नगर, जळगाव) यांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवण्यासाठी त्यांना माहिती हवी असल्याने त्यांनी फेसबुकवर राम इन्व्हेस्टमेंट अकॅडमी नावाने जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या लिंकवर त्यांनी क्लिक केले असता त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करण्यात आले. ग्रुपवर गुरुराम आणि दिया नावाच्या अॅडमिनने एक लिंक पाठवली. लिंकवर गेल्यावर शेअर मार्केट संबंधित क्लास घेण्यासाठी सांगण्यात आले.


विविध चार्जेसच्या नावाखाली घातला गंडा
8 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2024 पर्यंत अनोळखी इसमाने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर्स खरेदी विक्रीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूशनल अकाउंट तयार करण्यास सांगून फिर्यादीला विविध कारणांसाठी आणि चार्जेस नावाखाली एकूण पाच लाख 95 हजार 750 रुपये विविध बँक खात्यावरून उकळत आर्थिक फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस स्टेशनला 27 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता.
दिल्लीतून आवळल्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसंत बेलदार, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, नितीन भालेराव, प्रशांत साळी यांनी आरोपींना अटक केली.
संशयीत पोलीस कोठडीत
पथकाने तांत्रिक विश्लेषण करून 24 जून ते 25 जूनदरम्यान दिल्लीच्या पटेल नगर भागातून दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पंजाब नॅशनल बँकेच्या कागदपत्रात दिलेला व लिंक असलेला मोबाईल फोन, विविध बँकांचे एटीएम कार्ड ताब्यात घेण्यात आले. आरोपींना गुरुवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.







