वरणगाव ऑर्डनन्समधून एके 47 चे पाच काडतूस चोरणार्या अधिकार्याची पोलीस कोठडीत रवानगी
भुसावळ : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील गुणवत्ता आश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश जयसिंग इंगळे यास एके- 47 रायफलीत वापरलेले जाणारे पाच जिवंत चोरताना सतर्क सुरक्षा रक्षकांनी अटक केली होती. संशयीताला भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असलेला सहा.अभियंता सतीश जयसिंग इंगळे याने बुधवार, 26 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडताना दुचाकी (एम.एच.19 ए.टी.1504) च्या हेडलाईटच्या कव्हरमध्ये अॅम्युनेशन 7.62 ची एके 47 शस्त्रात वापरली जाणारे पाच जिवंत काडतूस लपवले. हा प्रकार सुरक्षा रक्षक सी.व्ही.भारंबे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंगळे यास रोखून धरत हा प्रकार सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना कळवला. घडल्या प्रकाराची माहिती कार्यप्रबंधक संभाजी सुधाकर पावडे यांनाही कळवण्यात आली.

चोरलेले काडतूस एके 47 चे
वरणगाव आयुध निर्माणीत एके 47 रायफलीत वापरले जाणारे काडतूस तयार केले जाते व 400 रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने फॅक्टरीतील एसक्यूएई विभागाचे ए.ई. सतीष जयसिंग इंगळे याने चोरल्याने याप्रकरणी पॅकींग सेक्शनचे कार्य प्रबंधक संभाजी सुधाकर पावडे (30) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहे.
