वरणगावात दुभाजकासह लाईटाचे काम न झाल्यास 3 रोजी रास्तारोको
सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन ः कामे मंजूर मात्र निरुत्साहाने संताप
भुसावळ : वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कल दरम्यान रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे. हा रस्ता वरणगाव शहरातील मुख्य रस्ता असून रस्त्यावर विद्यार्थी व नागरिक यांच्या वर्दळीचे प्रमाण अधिक आहे शिवाय रेल्वे स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, महात्मा गांधी विद्यालय, तीर्थ क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरासह बोदवड तालुक्याला हा रस्ता जोडला जातो. अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर राखेच्या मोठ-मोठ्या डंपराद्वारे वाहतूक सुरू आहे व अपघातांची मालिका कायम आहे. हा रस्ता प्रशस्त होणे क्रमप्राप्त आहे मात्र सा.बां.विभागाच्या निरुत्साहीपणामुळे मंजूर दुभाजकासह लाईटाचे काम मंजूर असतानाही काम केले जाणार नसल्याची भूमिका घेण्यात आल्याने स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. मंजूर कामे न झाल्यास 3 जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हा तर विश्वासघात
रस्त्यावर दुभाजक व लाईट लावून रस्ता प्रशस्त व्हावा यासाठी वरणगावकरांनी स्वाक्षरी अभियान राबवले. त्यात तीन हजार तीनशे नागरिकांनी स्वाक्षर्या करीत रस्त्यात दुभाजक टाकण्याची मागणी केली व लाईट लावण्याची अपेक्षा केली मात्र अधिकार्यांनी हात वर केल्याने संताप व्यक्त होत आहे. मंजूर दुभाजक व लाईट टाकून रस्ता हा तातडीने करण्यात यावा, वरणगाव समांतर महामार्गाबाबत राज्य शासनाकडे बजेट प्रस्ताव पाठविण्यात यावा, नागेश्वर महादेव मंदिर रेल्वे पुल, सिध्देश्वर नगर रेल्वे पुलाखालील पाणी काढावे आदी मागण्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास 3 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

3 रोजी रास्ता रोकोचा इशारा
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, उपनगराध्यक्ष शेख अखलाख शे.युसूफ, कामगार नेते मिलिंद भाऊ मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, गोलूभाऊ राणे यांच्या उपस्थित रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रवासी संघटनेचे आध्यक्ष नानाभाऊ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, अॅड.ए.जी.जांजाळे, योगेश माळी, किरण भैसे, रिक्षा चालक-मालक युनियन अध्यक्ष हितेश चौधरी, डॉ.सादिक शेख, जिल्हा सरचिटणीस हाजी फहीम शेख, फजल भाई, अजमल शेख, मुस्लिम भाई अन्सारी, कृष्णा महाजन, बळीराम सोनवणे, नामदेव सोनवणे, डॉ.नाना चांदणे, साबीर कुरेशी, रमेश पालवे, अनिल वंजारी, नंदू जोशी, शंकर पवार, ज्ञानेश्वर घातोळे, अरुण बावणे, इरफान पिंजारी, नुरू शेख, भोजराज पालवे, मयूर शेळके, अलीम शाह आदींनी केले आहे.




