कामगारांसाठी भुसावळात ईएसआयएस दवाखाना उभारा
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांना शिशिर जावळे यांचे साकडे
भुसावळ : कामगारांसाठी भुसावळात ईएसआयएस दवाखाना उभारावा, अशी मागणी भुसावळचे शिशिर जावळे यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांकडे केली आहे. कर्मचारी राज्य विमा योजना हा भारतातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा कार्यक्रम आहे जो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आजारपण, दुखापत किंवा अपंगत्व तसेच इतर आरोग्य सेवा सुविधांच्या बाबतीत आर्थिक सहाय्य आणि वैद्यकीय सेवा प्रदान करतो. ही योजना सर्व कारखाने आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. ज्यात ई एसआय कायद्यामध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असलेले, विविध कारखाने, तसेच कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांकडे काम करणारे कर्मचारी, रेस्टॉरंट, वृत्तपत्र आस्थापने, सिनेमागृह, थिएटर हॉटेल्स रोड मोटर वाहतूक उपक्रम आणि दुकानांसह मॉलमध्ये काम करणारे सर्व कामगार या योजनेंतर्गत पात्र आहेत.
कंत्राटी कामगारांची होईल सोय
या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात अमळनेर, जळगाव शहर, चाळीसगाव आणि जळगाव एमआयडीसी येथे या योजनेंतर्गत कामगारांसाठी रुग्णालये आहेत मात्र भुसावळ तालुक्यात कर्मचारी राज्य विमा योजनेचे इएसआयएस रुग्णालय नसल्याने भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र, ऑडनन्स फॅक्टरी, रेल्वे, नगरपालिकासह इतर शासकीय कार्यालय, खाजगी कारखाने व इतर आस्थापनांवर कार्यरत असणारे कर्मचारी तथा कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांकडे काम करणारे तसेच भुसावळ एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये कार्यरत हजारों कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यासाठी वैद्यकीय सेवेसाठी जळगावस्थित ईएसआयएस रुग्णालयात जाण्यासाठी बराच वेळ लागतो यामुळे वेळेअभावी व उपचाराअभावी कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागतो. भुसावळ तालुक्यासाठी कर्मचारी राज्य बीमा योजनेचे ईएसआयएस रुग्णालय तत्काळ मंजूर करून भुसावळ शहरात उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे.





