गुरुमंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे गरजेचे : संत गोपाल महाराज


पाल, ता.रावेर : गुरूदेवा प्रति श्रद्धा व त्यांनी दिलेल्या गुरु मंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे अति आवश्यक, असे प्रतिपादन श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे विद्यमान पदस्थ व परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांचे कृपापात्र शिष्य श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वृंदावम धाम पाल आश्रमात आलेल्या भाविक भक्तांना त्यांनी मार्गदर्शन केले. अतुट भक्ती असलेल्या एका शिष्याचे त्यांनी उदाहरणही दिले.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन
रविवार, 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सातपुड्यातील पाल येथील सदगुरु परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम येथे देशभरातून किमान पन्नास हजाराहून अधिक चैतन्य साधक भक्त परिवाराचे सदस्य गुरु दर्शनार्थ आले होते. शनिवारी दुपारी मध्यप्रदेशहुन व कन्नड़, सोयगाव, जामनेरहुन दोनशे किलोमीटरचा पायी दिंडीचा प्रवास करीत हजारो चैतन्य साधक भक्त परिवार पाल वृंदावन धाम आश्रमात दाखल झाले. त्यांच्या स्वागताकरिता आश्रमाचे विद्यमान गादिपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराजांसह ब्रम्हचारी यांनी किमान दहा किलोमीटरचा पायी प्रवास करीत केला.


समाधीस्थळी पादुका पूजन
रविवार, 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त पाल वृंदावन धाम आश्रमातील श्री हरिधाम मंदिरात विराजित परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या समाधीस्थळी पहाटे पाच वाजता सद्गुरु पादूका पूजन, आरती तसेच दर्शनाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळी सात वाजेला गुरुदीक्षा व चैतन्य ध्वजारोहण करण्यात येऊन सकाळी नऊ वाजेपासून ध्यान, साधना, प्रार्थना, गुरुपुष्पांजली भजन व श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या मुखातून सत्संग अमृताचा भाविकांना लाभ मिळाला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दहावी-बारावी परीक्षेत 70 टक्क्यांवर गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातील विविध समितीचा सत्कार शनिवार, 20 जुलै रोजी करण्यात आला. त्याचप्रमाणे पार्किंग सेवा, आरोग्य सेवा, सत्संग पांडाल, पूज्य बापूजी समाधी दर्शन सेवा अश्या विविध सेवेमध्ये प्रशासनासोबत चैतन्य युवा सेक्युरिटी संघाने हातभार लावला. या महोत्सवात रावेरचे आमदार शिरीष चौधरी, धनंजय चौधरी, भुसावळचे अनिल चौधरी, माजी खासदार हरिभाऊ राठोड, तहसीलदार बंडू कापसे, रावेर पोलीस निरीक्षक विशाल जायसवाल, पाल उपनिरीक्षक सचिन नवले, आरोग्य दूत रामेश्वर नाईक, सांसद प्रतिनिधि नंदा ब्राम्ह्मणे, आत्माराम जाधव, श्याम चैतन्य, शिव चैतन्य, दिव्य चैतन्य, ब्रज चैतन्य, नवनीत चैतन्य, महेश चैतन्य, राधे चैतन्य, सर्व चैतन्य, ऋषी चैतन्य, शुभ चैतन्य, हरीश चैतन्य, राम चैतन्य, माधव चैतन्य, लालसिंग महाराज आदींसह चैतन्य साधक परिवाराचे विविध समितीचे संचालक व देशभरातून हजारो साधक उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !