10 ते 15 एचपीपर्यंत मोटर्स असणार्या शेतकर्यांना द्यावी वीज बिल माफी
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची राज्य शासनाकडे मागणी
भुसावळ : राज्याच्या अर्थसंकल्पात 7.5 एचपी इलेक्ट्रीक मोटर असलेल्या लहान व मध्यम शेतकर्यांना महायुती सरकारने वीज बिल माफ करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती मात्र राज्यात 10 ते 15 एचपीपर्यंत मोटर्स असणार्या अल्पभूधारकांची संख्या मोठी असल्याने या शेतकर्यांनाही मोफत वीज देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अल्प भूधारकांना द्यावा दिलासा
महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर केली. या योजनेतंतर्गत् 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान व मध्यम शेतकर्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, जळगाव जिल्ह्यात केळी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. अनेक भागातील पाणी पातळी ही 200 फुटापर्यंत असल्याने शेतकर्यांना 10 ते 15 एचपी मोटर्सची आवश्यकता असते त्यामुळे अल्प भूधारक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेपासून वंचित राहणार असल्याने या शेतकर्यांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे. या बाबीवर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झालेली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार असल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना आश्वासन दिले आहे.





