आई घरात जीवन शिक्षण देणारी संस्कारांची शाळा!
द्वारकाई व्याख्यानमालेत डॉ.मिलिंद बागूल यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
भुसावळ : आयुष्याच्या खडतर वाटा समृद्ध करण्यासाठी नेहमी पुस्तकांशी मैत्री करा. आई घरात जीवन शिक्षण देणारी एक शाळा आहे. मुलाचे सर्व गुन्हे पोटात घेऊन ते माफ करणारे मायालय आहे. कष्टकरी माय0बापाच्या स्वप्नांची जाणीव ठेवा, असा सल्ला जळगावचे साहित्यीक डॉ.मिलिंद बागूल यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय द्वारकाई फिरती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात ‘शालेय शिक्षण, जीवन व मैत्रिभाव’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना डॉ.बागूल बोलत होते. दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालयात हे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी या शाळेचे संचालक एस.आर.झांबरे हे होते.
यांची होती उपस्थिती
गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, मुख्याध्यापक एस.बी.कुमावत, प्रमोद शुक्ला, दीपक चौधरी, अ.फ.भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे. पुढच्या वर्षी तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविकातून दिली. सांस्कृतिक वारसा जतन करत पिढी घडवण्यासाठी व दिशा देणारी ही व्याख्यानमाला आहे. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी असे उपक्रम निरंतर झाले पाहिजे, असे गटशिक्षणाधिकारी वायकोळे यांनी नमूद केले. आभार जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी मानले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करा
प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ करू नका. जीवनाच्या वाटा समृद्ध करायच्या असतील तर संकटांना घाबरू नका. महापुरुषांची चरित्रे वाचून ती आत्मसात करा. वयोगट कुठलाही असू द्या. त्यात मैत्रीभाव नक्कीच असतो. संकट, दुःख, वैफल्यग्रस्त स्थितीत असलेल्या व्यक्तीने मदत मागण्यापूर्वी धावून जाणे म्हणजे मैत्री होय. मैत्री समजून घ्यायची असेल तर अकोल्याचे कवी अनंत राऊत यांची ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ ही कविता ऐका व आत्मसात करा, असे आवाहन बागूल यांनी या व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी केले.
माय बाप जगण्याच्या वाटा समृद्ध करतात
प्राथमिक शिक्षण घेतान शाळा बुडू नये म्हणून बाप आपल्याला बदडतो. पण त्याच्या मनात द्वेष नसतो. तो बदडतो कारण त्याला तुमच्या जगण्याच्या वाटेवरील काटे वेचायची असतात. तुम्ही कितीही खोड्या केल्या आणि त्या लावल्या तरी माय बापाला त्या सहज कळतात. त्यांना काही कळत नाही असे समजू नका. ज्ञान, विज्ञान, आत्मज्ञानासाठी शिक्षण आहे हा विचार नेहमी डोक्यात ठेऊन पुढे पाऊल टाका, असा सल्लाही डॉ.मिलिंद बागूल यांनी विविध उदाहरणातून दिला.




