बर्‍हाणपूरसह इतर कृउबात समन्वय साधून केळीचा दर ठरवा

जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद : रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापार्‍यांची बैठक


रावेर : नवीन तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. व्हीसीच्या माध्यमातून केळी क्षेत्र असलेल्या बाजार समितीनी बैठक घ्यावी. त्यात केळीचे भाव निश्चित करतांना जळगाव जिल्हा व बर्‍हाणपूर समित्यांनी समन्वय साधावा. व्यापार्‍यांची बँक हमी घेऊन परवाना द्यावा तसेच बोगस व्यापार्‍यांवर समित्यांनी कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे केल्या. रावेरातील माजी सैनिक हॉलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने केळी लिलाव सुरू करणे, भावातील तफावत, स्थिर भाव याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांची बैठक झाली. दरम्यान, बैठकीत केळी लिलावासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, बर्‍हाणपूर बाजार समितीचे हितेंद्र सिकलवार, रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


जिल्हाधिकार्‍यांनी जाणल्या समस्या
जिल्हाधिकारी यांनी केळी पिकाबाबत शेतकरी व व्यापारी यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. केळी पीक पद्धत चक्राकार पद्धतीने लावावीत यासाठी तीन, चार वर्ष संघर्ष करावा लागेल. केळी पीक सिंगल प्रॉडक्ट न ठेवता विशेषतः मल्टी प्रॉडक्ट करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा, रावेर सह जिल्ह्यातील केळी क्षेत्र असलेल्या बाजार समिती व बर्‍हाणपूर बाजार समिती मिळून केळी भाव एक राहिल यासाठी समन्वय ठेवावा. सर्व व्यापार्‍यांचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे त्यासाठी बँक हमी महत्वपूर्ण आहे. बोगस व्यापारी शोधून समित्यांनी अशा व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करावी तसेच तीन किलो कट्टीचा निर्णय समन्वयाने सोडवावा, व्यापारी व शेतकरी यांच्यात स्पर्धेचे वातावरण नसावे, दोघांनाही एकमेकाची गरज आहे, केळीचे भाव वाढण्यासाठी व्यापारी व शेतकर्‍यांना सोबत घेऊन बाजार समितीने नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

केळी संदर्भात झाला तक्रारींचा पाऊस
नंदकिशोर महाजन म्हणाले की, शेतकर्‍यांनी वेळी पिकाच्या दर्जाकडे लक्ष देऊन निर्यात क्षम केळीचे उत्पादन घेण्याकडे भर द्यावा. सुरेश शिंदे म्हणाले की, केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. अरविंद गांधी म्हणाले की, एक बिल पद्धत लागू करावी. दिनेश पाटील म्हणाले की, व्यापार्‍यांनी तीन टक्के कट्टी लाऊ नये घेतल्यास शेतकर्‍यांनी तक्रार करावी. सुरेश धनके यांनी लिलाव पद्धत सुरू करण्याची मागणी केली तर राजीव पाटील यांनी 80 टक्के व्यापारी बोगस आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा व परवाना देतांना समितीने बँक गॅरंटी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विशाल अग्रवाल यांनी केळीचे कंटेनर परदेशात पाठवतांना व्यापार्‍यांच्या त्याबद्दल असलेल्या पेमेंट पध्दतीबाबत माहिती दिली. या बाबत बाजार समितीने बँक अरेंजमेंट करावे, यासह पाणंद रस्ते, तक्रारीसाठी हेल्प लाईन सुरू करावी. माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, कृउबा संचालक प्रल्हाद पाटील, पितांबर पाटील, योगीराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, प्रणित महाजन, सुरेश पाटील यांच्यासह शेतकरी व्यापारी यांनी प्रश्न उपस्थित केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, व्यापारी संजय अग्रवाल, नितीन पाटील, संतोष पाटील, रमेश वैदकर, विनोद पाटील, बाजार समिती संचालक डॉ.राजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुयटे, मंदार पाटील, सैय्यद असगर यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सभापती सचिन पाटील तर सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !