भुसावळातील साडेतीन वर्षीय बालकाचा मोकाट कुत्र्यांनी घेतला बळी
जुना सातारा भागातील घटना : पालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
भुसावळ : शहरातील मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने जुना सतारा भागातील वेदांत अनिल मालखेडे (3.5) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. मोकाट कुत्र्यांनी वेदांतच्या चेहर्यावर चावा घेतल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यूशी झुंज संपली. दरम्यान, शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला असतानाही पालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने सुज्ञ नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने माता-पित्यांनी टाहो फोडल्याने उपस्थितांनाही गहिवरून आले. शनिवारी शोकाकुल वातावरणात बालकावर दफनविधी करण्यात आला.
16 दिवसांची झुंज अखेर संपली
जुने सतारे भागातील कोळी वाड्यानजीक अनिल मालखेडे हे परीवारासह राहतात. 21 फेब्रुवारी रोजी वेदांत हा आपल्या आजीसह बसला असताना मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवल्याने त्याच्या चेहर्याला मोठ्या प्रमाणावर ईजा झाल्यानंतर भुसावळ पालिकेच्या दवाखान्यात रॅबीज व टीटीचे इंजेक्शन दिल्यानंतर बालकास अधिक उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात सांगितल्यानंतर जळगावात त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर पुन्हा भुसावळात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. पालिका रुग्णालयात इंजेक्शन देवूनही बालकाची प्रकृती सुधारत नसल्याने त्यास खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले मात्र बाळाची तपासणी न करता जळगावात हलवण्यात सल्ला देण्यात आला तर तेथेदेखील वेगळा अनुभव आला नाही. ऑक्सीजन सिलिंडर व व्हेंटीलेटर नसल्याचे कारण देण्यात आल्याने नशिराबादी येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला असता शनिवारी सकाळी 8.15 वाजता या बालकाचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलाच्या मृत्यूने आई ज्योती व वडिल अनिल मालखेडे यांनी हंबरडा फोडला.



