मराठवाडा आता मुंबई-दिल्लीशी होणार कनेक्ट : जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राची मंजुरी
Marathwada will now be connected to Mumbai-Delhi: Center approves Jalna-Jalgaon Broad Gauge Railway मुंबई (10 ऑगस्ट 2024) : जालना ते जळगाव या 174 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला केंद्रीय मंत्री मंडळाने शुक्रवारी मंजुरी देण्यात आली असून सात हजार 106 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेण्यांशी जोडणीला चालना मिळणार आहे शिवाय मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत जलद मार्ग उपलब्ध होणार असून सिल्लोड भागात औद्योगिक वाढ होण्यास मदत होईल.
कॅबिनेटच्या बैठकीत मिळाली मान्यता
तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जालना – जळगाव नवीन लोहमार्गासाठी आता केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावावर केंद्राने शिक्कामोर्तब करून जालना लोकसभा मतदारसंघातील नागरीकांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

पर्यटन क्षेत्राला मोठा वाव
या रेल्वेमार्गामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट होवून पर्यटनक्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे. अजिंठा लेण्यांमुळे हा मार्ग विदर्भासह मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठा सोईस्कर ठरणार आहे. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र राजूरचे गणपती मंदिर देखील याच लोहमार्गावर आल्याने मराठवाडा – खान्देशाचे संबंध अधिक दृढ होण्यास मोठी मदत होणार आहे. थेट उत्तर भारताशी जोडणार्या या रेल्वे मार्गास केंद्र सरकारच्या कॅबीनेटमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर आता लवकरच भूसंपादनासह पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
प्रकल्पाची महत्वपूर्ण वैशिष्ट्य-
प्रकल्पाची एकूण किंमत- 7106 कोटी.
राज्य सरकारची सहभागिता- 50 टक्के
रोजगार निर्मिती- या प्रकल्पामुळे 60 लाख मनुष्य-दिवसांचे रोजगार निर्माण होतील.
जमीन संपादन- प्रकल्पासाठी 935 हेक्टर जमीन संपादित केली जाईल.
उर्जा उत्सर्जन बचत- प्रकल्पामुळे 54 कोटी किलो उर्जा उत्सर्जन वाचवले जाईल. जे 2.2 कोटी झाडांच्या लागवडीच्या समतुल्य आहे.
हा प्रकल्प परिसराच्या विकासाला चालना देईल आणि विशेषतः सिल्लोड सारख्या भागांमध्ये औद्योगिक वाढ घडवून आणेल.
