मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले : कपटी सावत्र भावांपासून सावध रहा !
मुंबई (12 ऑगस्ट 2024) : कपटी सावत्र भावांपासून सावध रहा, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत विरोधकांवर निशाणा साधला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भीक घेऊ नका, विकले जाऊ नका. लाच घेऊ नका हे कुठले शब्द तुम्ही बहिणींसाठी वापरताय? तुम्हाला 1500 रुपयांचे मोल नाही.मात्र सर्वसामान्य महिला भगिनींना त्याचे मोल आहे. तिचं कुटुंब चालवायला कसरत करावी लागते. 1500 रुपये ती बहिण घरासाठी खर्च करेल. हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील. अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. माझी प्रत्येक बहिण, कुटुंबातील स्त्री अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे मोफत सिलेंडर योजना, 1500 रुपये दिले आहेत. विरोधकांच्या टीकेला माझ्या बहिणी उत्तर देतील, असं त्यांनी सांगितले.
याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल
मुख्यमंत्री म्हणाले की, लाडकी बहिण योजना, आनंदाचा शिधा यासारख्या गरिबांसाठी असणार्या योजनांविरोधात विरोधक कोर्टात गेले. गोरगरिबांच्या तोंडचा घास तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करताय. कोविडमध्येही तुम्ही खिचडी हिसकावली. मात्र आता तुम्ही गोरगरिब बहिण, भावांचा घास हिरावताय त्याचे उत्तर तुम्हाला या निवडणुकीत तुम्हाला द्यावे लागेल. सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, दोन दिवसाने पडेल असं सांगत होते आज सरकारला 2 वर्ष होऊन गेली. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी आणलेल्या योजनेचे तुम्ही फॉर्म कसे भरता, बॅनर लावतात त्यामुळे हे लोक दुटप्पी आहेत.

परमबीर सिंह यांचे आरोप वस्तूस्थिती
परमबीर सिंह यांनी जे आरोप केले ती वस्तूस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं हे समजू शकतो परंतु मी तर त्यांच्या सरकारमधील मंत्री होतो. माझ्याबाबतीत अशाप्रकारे प्रयत्न केला गेला. मी स्पष्टपणे योग्य वेळी याबाबत सांगेन. मला गुन्ह्यात अडकवण्याचा, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तूस्थिती आहे. मी योग्य वेळी त्यावर बोलेन असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांना दुजोरा दिला.




