शहराचा विकास हा लोकप्रतीनिधीवर अवलंबून


माजी मंत्री गिरीष महाजन : वरणगावात भव्य सत्कार

वरणगाव : शहरात अडीच वर्षांच्या काळात 65 कोटी रुपयांची कामे झाली असून ही कामे करण्यासाठी धावपळ करणारा नगराध्यक्ष हवा असतो. स्वत: फाईली घेवून पाठपुरावा केल्यानंतरच ते शक्य होत असते. सर्वसामान्य नागरीकांना रस्ते, वीज, गटारी व पाण्याची गरच असते. या पायाभूत गोष्टी शहरात पूर्ण झाल्या आहेत. काही योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यादेखील मार्गी लागतील. पुढची पाच वर्ष मिळाली असती तर शहराचा कायापालट नक्कीच झाला असता. येणार्‍या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निवडून द्या व शहराचा वेगाने विकास करून महाराष्ट्रातील नंबर एकचे शहर करण्यावर भर द्या,. शहराच्या विकासासाठी योग्य लोकप्रतिनीधी निवडून देण्याचे आवाहन माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

महाआघाडी सरकारकडून अन्याय
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या काळात 65 कोटींचा निधी मिळाल्याने माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व कृतज्ञता सत्कार सोहळ्याचे आयोजन शहरात करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी मंत्री महाजन म्हणाले की, गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारने कुणावरही अन्याय केला नाही मात्र महाआघाडीच्या सरकारने अर्थसंकल्पात पश्चीम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यावर अन्याय केला आहे. उत्तर महाराष्ट्र, जळगाव यांचे नावदेखील नाही. अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी देखील निधी देण्यात आलेला नाही. शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचे शासन दाखवत आहे मात्र तीन महिन्यात शेतकर्‍यांच्या शेतात भारनियमन सुरू केले. ट्रान्सफार्मर मिळवण्यासाठी वाट बघावी लागत आहे. एका बाजुला पाण्याने शेतकर्‍याला मारले आत पाणी आहे पण भारनियमनामुळे पिकांना पाणी देवू शकत नाही. मग ही कर्जमुक्ती तरी काय कामाची आहे. शासनाने पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक योजनांनादेखील स्थगिती दिली आहे. गेल्या पाच वर्षात एकही शेतकर्‍यांचा एकही मोर्चा निघाला नाही. आता तर फक्त तीन महिने या सरकारला झाले आहे. पुढे खुप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. वरणगाव शहराला नंबर एकचचे शहर बनविणार तसेच शहरात शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




विकासकामांना संधी द्या -सुनील काळे
प्रास्ताविकात नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, जाती-पातीचे राजकारण न पाहता गिरीश महाजनांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली. गेल्या अडीच वर्षात विकास कामांसाठी झपाटलो गेलो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या मदतीने शहरात 65 कोटी रुपयांचा निधी आणून विकासकामांना चालना दिली आहे. या निवडणुकीत शहराला विकास पाहिजे असेल तर मतदारांनी जाती-पातीला बाजुला सारत विकासकामे करणार्‍यांना संधी देण्याचे आवाहन केले.

हेवा करावासा वाटतो -आमदार सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, वरणगाव शहरातील विकास, स्वच्छता पाहून हेवा वाटतो. सर्वसामान्यांच्या मागण्या तरी काय तर प्राथमिक सुविधा आहेत. त्या गरजा नगरपालिकेने पूर्ण करणे गरजेचे आहे यासाठी नगराध्यक्ष धावपळ करणारा असेल तर विकास निशिचित होतो हे वरणगाव शहराच्या विकासावरून लक्षात येते. नवनिर्मित पालिका असतानादेखील करोडो रुपयांचा निधी शहरात आला, अशी ही महाराष्ट्रातील एकमेव पालिका आहे. हे केवळ धावपळ करणार्‍या लोकप्रतिनिधीमुळे शक्य आहे. या नगरपालीकाचा हेवा करावासा वाटतो. शहर हे लवकरच तालुका होण्याच्या मार्गावर आहे. प्रगती करणारे शहर म्हणुन ओळख होईल. ज्या पध्दतीने वरणगाव नगरपालिकेला माजी गिरीश महाजन यांचा आशीर्वाद आहे, तसा थोडासा आशीर्वाद भुसावळ नगरपालिकेवरदेखील राहू द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. विकासकामात राजकारण न करता भाजपाला येणार्‍या निवडणुकीत स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

वरणगाव पालिकेवर भाजपाचा झेंड फडकवा -हरीभाऊ जावळे
माजी खासदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष झाल्यापासून वरणगाव नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येवून पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. शहरात विकासाला चालना मिळाली आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार येवून गेलेत मात्र जिल्ह्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली नाही.

पालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र या
गेल्या अडीच वर्षापासून भारतीय जनता पार्टीत फूट पडली आहे. खडसे गटात पाच तर महाजन गटात तीन नगरसेवक आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटांनी स्वतंत्र प्रचार केला. एकमेकांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकारी, उच्च न्यायालय व नगरविकास मंत्र्याकडे भांडत आहेत. यावेळी वरीष्ठ नेत्यांकडून एकत्र करण्यासाठी कोणताही प्रयत्न झाला नाही. मात्र कालच्या झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावरून जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे व आमदार संजय सावकारे यांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांना मतभेद विसरून भारतीय जनता पक्षाच्या सत्तेसाठी एकत्र येण्याचा सल्ला दिला. ही चर्चा बंद खोलीत होणे अवश्यक असताना व्यासपीठावर झाल्याने उभयतांचे कान टवकारले. या कार्यक्रमासाठी खासदार रक्षा खडसे यांचे नाव पत्रिकेत असतानादेखील त्या अनुपस्थित राहिल्या तर खडसे गटाच्या पाच नगरसेवकांचे आमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने ते देखील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
75 लाखाची ई लायब्ररी, 10 बस पीकअप शेड, 65 लाखांची व्यायाम शाळा, दोन कोटी 74 लाख तीर्थक्षेत्र महादेव मंदिर, 63 लाख माळी समाज भुवन, 3 बुध्द विहार, छत्रपती शिवाजी स्मारक, घनकचरा प्रकल्प अशा एकुण 65 कोटी रूपयांच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीभाऊ जावळे, माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार संजय सावकारे, भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, चंद्रकांत बढे, अल्लाऊद्दीन शेख, संजय जैन, इरफान पिंजारी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचलन अजय पाटील यांनी तर आभार श्यामराव धनगर यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !