रक्षाबंधनानंतर धरणावर पोहोचला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने निमगावच्या तरुणाचा मृत्यू
यावल (20 ऑगस्ट 2024) : रक्षाबंधनानंतर यावल तालुक्यातील निंबादेवी धरणावर मित्रांसह पर्यटनासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. वेदांत सुवर्णसिंग पाटील (20, रा.निमगाव, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
खड्ड्यात पडल्याने दुर्घटना
निमगावात वेदांत हा येथे आई-वडील, बहिण यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत वेदांत पाटील हा निंबादेवी धरण येथे पोहोण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यातला खड्ड्यात पडल्याने बुडायला लागला.

दरम्यान, त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत पाण्यात उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. या वेळेला काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
दरम्यान, यावेळी वेदांत पाटीलच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. डोळ्यांसमोर मित्र बुडाल्याने मित्रांना शोक अनावर झाला होता. यावल पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एकुलता एक मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकूलता भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
