भुसावळातील साईचंद्र नगराचे स्ट्रक्चरल ऑडीट
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : रेराकडे तक्रारीचा पर्याय : 25 रहिवाशांना नोटीसा ; तीन कुटूंबाना हलवले
Structural Audit of Saichandra Nagar in Bhusawal भुसावळ : शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगरातील तीन दुमजली घरे पालिकेची रिटेनिंग वॉल पडताच कोसळली होती. रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली होती. सुदैवाने सकाळीच रहिवासी बाहेर निघाल्यानंतर अप्रिय घटना टळली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनाच्या अधिकार्यांसह पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्रॅक्चरल ऑडीटचे आदेश देत धोकादायक ईमारतीच्या परिसरातील नागरिकांना नोटीसा बजावण्याचे निर्देश दिले शिवाय ईमारतीची पाहणी करताना बेस नसल्याचे निरीक्षण नोंदवत या संदर्भात चौकशीचे आदेश अधिकार्यांना दिले. यावेळी स्थानिक रहिवाशांनी बांधकामाच्या दर्जासह बिल्डरकडून भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हाधिकार्यांनी दोषी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करणे अथवा रेराकडे भरपाईसाठी तक्रार करणे हा पर्याय असल्याचे सूचवले. दरम्यान, या वसाहतीतील तीन ईमारती धोकेदायक असल्याने त्यातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले तर 25 घर मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या.
नागरिकांचा रोष : पैसे परत करा
अॅड.गौतम साळुंखे, सुदाम सोनवणे व अन्य महिलांनी स्थानिक रहिवाशांच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे आपले म्हणणे मांडले. नागरिकांनी कर्ज करून व हयातीची जमा-पूंजी खर्च करून घरे घेतली मात्र ती कोसळल्याने कुटूंब आता उघड्यावर आले आहे तर अन्य रहिवासी घरांना धोका निर्माण झाल्याने आमचे बिल्डरला दिलेले पैसे काढून द्यावेत तसेच बिल्डरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात उर्वरीत घरांना धोका पोहोचणार नाही यासाठी पुन्हा दर्जेदार पद्धत्तीने रिटेनिंग वॉलचे काम करावे तसेच यापूर्वी झालेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॉलनीत गटारी नसल्याने पालिकेने तातडीने सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली.

बेस दिसून आला नाही : कंत्राटदाराला नोटीस बजावणार
साईचंद्र नगरातील तीन दुमजली घरे कोसळल्यानंतर पाहणीप्रसंगी बेस दिसून आला नाही. संबंधित ईमारतीचे बांधकाम करणार्या बिल्डरसह बांधकाम करणार्यास नोटीस बजावण्यात येत आहे. या परिसरातील बिल्डींग स्टेबॅलेटी तपासणीसाठी खाजगी अभियंता तसेच पीडब्ल्यूडीची मदत घेण्याच्या सूचना पालिका अधिकार्यांना केल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. सॉईल टेस्टींगही करण्यात येणार असून धोकेदायक इमारतीच्या परिसरातील रहिवाशांना नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भुसावळ शहरताील 85 ईमारतींची स्ट्रक्चर तपासणीचे आदेशही या अनुषंगाने दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेने या प्रकरणाची चौकशी करताना कुठलाही राजकीय दबाव न स्वीकारता प्रामाणिकपणे चौकशी करावी, अशी अपेक्षा संतप्त महिलावर्गाने व्यक्त केली.
घर कोसळलेले तीन कुटूंब नातवोईकांकडे
रुख्मिणी प्रवीण नरवाडे तसेच चंद्रकला रमेश दांडेकर-मनोज रमेश दांडेकर तसेच विराज चंद्रकांत चौधरी-विद्या चंद्रकांत चौधरी या कुटूंबियांची तीन घर कोसळली होती. प्रशासनाने कुटूंबाची लोणारी मंगल कार्यालयात राहण्यासह जेवणाची व्यवस्था केली मात्र हे सदस्य आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले तर पद्मालय अपार्टमेंटमधील 19 सदस्यांनाही तातडीने अपार्टमेंट खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या व त्यांचीही व्यवस्था लोणारी मंगल कार्यालयात करण्यात आली मात्र त्यांनीदेखील नातेवाईकांकडे राहणे पसंत केले. लोणारी मंगल कार्यालयात प्रशासनाने मात्र केटर्सच्या व्यवस्थेसह गाद्या टाकून रहिवाशांची अद्यापही व्यवस्था केल्याचे तहसीलदार निता लबडे म्हणाल्या.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी व प्रशासक जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, तहसीलदार निता लबडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, उपमुख्याधिकारी परवेज शेख व पालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आदी उपस्थित होते.
पालिकेकडून दुर्घटनेची चौकशी समिती
पसाईचंद्र नगर तापी नदीपासून अवघ्या काही अंतरावर वसले आहे शिवाय या नगराला लागूनच नालादेखील वाहतो. तीन घरे कोसळल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पालिकेतील सर्व विभागाच्या अधिकार्यांसह पीडब्ल्यूच्या अभियंत्यांसह भौगोलिक क्षेत्रातील जाणकार अभियंत्यांना घेवून पालिका प्रशासन आता घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहे.
धोकादायक तीन कुटूंबाना हलवले, 25 घर मालकांना बजावल्या नोटीसा
पसाईचंद्र नगरात तीन घरे कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. सर्वे क्रमांक 78 एक ब मधील साईचंद्र नगरातील अखेरच्या रांगेतील देवेंद्र धुंडले, संजय लोखंडे व श्रीधर पाठक यांच्या घरांना असलेला धोका व घरांना पडलेले तडे पाहता तीन कुटूबियांना तातडीने पालिकेने घर खाली करण्याच्या नोटीसा बजावत त्यांना घरे खाली करण्याचे आवाहन केले तसेच साहित्य हलवण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता करून दिली. दरम्यान, ईमारत कोसळलेल्या घटनास्थळापासून 50 मीटर अंतरावरील सुमारे 25 घर मालकांसह भाडेकरूंना ईमारती खाली करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या. पालिकेने तातडीने नागरिकांना पावसाचा असलेला धोका पाहता घरे खाली करण्यास सांगितल्याने नागरिकांच्या मनात धस्स झाले आहे तर अनेकांना अश्रू अनावर झाले आहे.
साईचंद्र नगरातील स्थानिक रहिवासी धास्तावले
पसाईचंद्र नगरातील तीन घरे पत्त्याच्या इमातीप्रमाणे कोसळल्यानंतर कॉलनीतील रहिवासी धास्तावले आहे. अनेक रहिवाशांना रात्रभर घडल्या घटनेने झोप आलेली नाही. अनेकांनी पदरचे सर्व खर्चून घरे घेतली आहेत तर नोकरदारांनी कर्ज काढून घरे घेतल्याने त्यांनाही येथून पुढे कसे होणार ? असा प्रश्न सतावत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तुम्हीच आमचे बाय-बाप आहात, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, किमान ईएमआयचे हप्ते पुढे ढकलून मिळावेत, अशी मागणीदेखील यावेळी रहिवाशांनी केली.
