विद्यार्थ्यांनो ध्येयपूर्तीसाठी कठोर मेहनत घेऊन शिक्षणातून स्वतःसह समाज व राष्ट्राचा विकास साधा : प्रा.डॉ.जतीन मेढे
भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : विद्यार्थी जीवनात शिक्षणातून आपणास नेमके कोणते ध्येय गाठायचे आहे हे विद्यार्थ्यांनी ठरवायला हवे. ध्येयाशिवाय जगणे म्हणजे दिशाहीन जगणे असून त्या जगण्याला अर्थ नाही. त्यासाठी ध्येय निश्चित करून ध्येय पूर्तीसाठी कठोर मेहनत घेऊन शिक्षणातून स्वतःसह समाज व राष्ट्राचा विकास साधा, असे प्रतिपादन प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी केले.प्रागतिक विचार मंच या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या ’ गौरव यशवंतांचा ’या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
भुसावळ तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या गौरव समारंभाचे आयोजन भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात क्रांतीदिनी करण्यात आले होते.





यांची होती उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या या गौरव समारंभास कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.जतीन मेढे होते. प्रमुख अतिथी म्हणून वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे , पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, प्रा.डॉ.सुनील नेवे, डॉ. राजेश मानवतकर , प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह पालकांचा गौरव
भुसावळ शहर व तालुक्यातून दीडशे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगताना प्रा.डॉ.मेढे म्हणालेत की, वर्गाच्या बाहेर बसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन परिस्थितीमुळे शिक्षण घ्यावे लागले. असंख्य अपमानाच्या प्रसंगाला सामोरे जात अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान मिळवून ते विसाव्या शतकात जगात ते ज्ञानाचे प्रज्ञासूर्य झाले. आपल्या ज्ञानाने त्यांनी या देशातील करोडो लोकांना माणूसपणाचे जगणे बहाल केले. करोडो शोषितांचेते मुक्तीदाते झाले . आपल्या देशाचे संविधान मोठ्या मेहनतीने आणि अभ्यासाने लिहून त्यांनी या देशातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाचे अधिकार दिले. त्यांच्या अर्थशास्त्रीय विचारांनी देशाला आर्थिक दिशा आणि गती दिली. या सर्वांना विद्यार्थ्यांनी समोर ठेवून आपली शैक्षणिक प्रगती केली पाहिजे.
याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ’ या जीवन बदलविणार्या अजरामर विचारांना विद्यार्थ्यांनी समोर ठेवून परिस्थितीशी लढण्याचे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनो कठोर मेहनतीत शिवाय आयुष्यात यश मिळत नाही. त्यासाठी प्रचंड अभ्यासातून ज्ञान मिळवा. आपली परिस्थिती आणि आयुष्यातील अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी हार मानू नका.जिद्दीने व नियोजन पूर्ण अभ्यासाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासनातील वजनदार अधिकारी व्हा ! असे सांगितले.
प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी इंग्लंडमधील बाबासाहेबांनी शिक्षणासाठी वास्तव केलेल्या ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्याचे सांगून जगातील सर्वात मोठे ग्रंथालय असलेल्या लंडन शहरातील दालनाला भेट दिली असता तेथील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र पाहून मी भारावून गेलो. जगाने डॉ. आंबेडकरांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. आंबेडकर आपणा सर्वांचे ऊर्जा आणि प्रेरणा केंद्र आहे. विद्यार्थ्यांनो डॉ.आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचून आपले जीवन घडवा, असे नेवे यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर अभ्यासातील एकाग्रता कशी साधावी या विषयावर राज्य समुपदेशक दिलीप सुरवाडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या अक्षय विजय बार्हे यांचा विशेष गौरव करण्यात आला तर भुसावळ व वरणगाव नगरपालिकेतून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवक लोकप्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे यांनी तर सूत्रसंचालन समाधान जाधर, पप्पू वानखेडे, विनोद बार्हे यांनी केले. आभार देवेंद्र तायडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संघरत्न सपकाळे, मिलिंद तायडे, सागर तायडे, विशाल दांडगे, प्रा.प्रशांत नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.