शेळगाव बॅरेजमधून यावल पालिकेसाठी पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाची मान्यता : यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची माहिती


यावल (29 ऑगस्ट 2024) : शेळगाव बॅरेजमधून यावल पालिकेसाठी पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाच्या जलसंपदा विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.

जलसंपदा विभागाकडून मिळाली मंजुरी
यावल शहरातील नागरिकांसाठी पुढील 30 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना होऊन दरडोई 135 लीटर पाणीपुरवठा व्हावा म्हणून यावल नगरपालिकेने जुन 2021 मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार समिती नेमून नाशिक येथील कंपनीस काम दिले होते. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आल्यानंतर पाणी आरक्षण प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.


2021 मध्ये पालिकेने केला होता ठराव
यावल नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा हा सद्यस्थितीत हतनूर धरणाच्या कालव्यातून होतो. नगरपालिकेने बांधलेल्या साठवण तलावात पाणी साठवण्यात येऊन जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध पाणी झाल्यानंतर त्यानंतर शहराला पाणी पुरवले जाते. हतनूर धरणावरील योजना सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची मंजूर असल्याने व हतनूर धरणावर जळगाव जिल्ह्यामधील 85 ग्रामपंचायती, भुसावळ व वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ, यावल, चोपडा, अमळनेर नगरपालिका अवलंबून असल्याने भविष्यात हतनूरवरील पाणीपुरवठा योजना यावल शहरासाठी पुरेशी होणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजुर होणेसाठी जुन 2021 मध्ये यावल नगरपर्षदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून नाशिक येथील कन्सल्टंट कंपनीस प्रस्ताव तयार करण्याचे काम देण्यात आले. या अनुषंगाने या योजनेचा प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेण्यात आली व सदरील प्रस्ताव शासनाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे.

पाणी आरक्षणास मंजुरी
प्रस्तावास शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प या जलाशयातून पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण मंजूर होणे गरजेचे असल्याने यावल नगरपरिषदेने तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे जळगाव अधीक्षक अभियंता यांच्यामार्फत प्रस्ताव शासनाच्या जलसंपदा विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला व या प्रस्तावास नुकतीच मान्यता मिळाली. शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून 2.82 दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षित करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती येथील पालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.

शासनाचे आभार : अतुल पाटील
शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातून यावल शहराला पाणी मिळावे यासाठी जू सर्व सहकारी नगरसेवकरांच्या सहकार्याने जुन 2021 मध्ये रीतसर ठराव मंजूर करून नाशिक येथील निसर्ग कन्सल्टंट या कंपनीस परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे काम दिले. या योजनेच्या सुमारे 82 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. 2.82 दशलक्ष घनमीटर इतके पाणी यावल शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित केल्यामुळे योजना कार्यान्वित झाल्यावर प्रती नागरिक 135 लीटर याप्रमाणे पाणी उपलब्ध होणार आहे. सदर काम मार्गी लावण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे विशेष आभार मानतो तसेच पाठपुरावा करणारे अभियंता सत्यम पाटील यांचे व यावल मुख्याधिकारी यांचेदेखील आभार मानतो, असे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील म्हणाले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !