अट्टल दुचाकी चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
चोरीच्या नऊ दुचाकी जप्त : दीपनगरातील दुचाकी चोरीचा उलगडा
जळगाव ê$ अट्टल दुचाकी चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असून त्याने जिल्हाभरातून चोरलेल्या दोन लाख 60 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या नऊ दुचाकी काढून दिल्या आहेत. भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीतील दीपनगर सरगम गेटजवळील चोरीच्या दुचाकीवरून आरोपीचा माग काढण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. गणेश बाबुलाल राजपुत (जंगीपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल विजय शामराव पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी आरोपीची माहिती मिळाली होती.
यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम, सहा.पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मानसिंग गिरासे , हवालदार सुनीत पंडीत दामोदरे, हवालदार जयंत भानुदास चौधरी, कॉन्स्टेबल विजय शामराव पाटील, सचिन प्रकाश महाजन, भगवान तुकाराम पाटील, महेश आत्माराम महाजन, नंदलाल दशरथ पाटील आदींनी आरोपीच्या शेंदूर्णी गावातून मुसक्या आवळल्या.



2019 मध्ये चोरली होती दुचाकी
शेंदुर्णी गावातील नाक्याजवळ आरोपी चोरीच्या मोटारसायकलसह मिळून आला. आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ही दीपनगर सरगम गेट येथून डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात चोरली होती व त्याबाबत भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या नऊ दुचाकीच्या चेसीस नंबर व इंजिन नंबरवरुन कोठे – कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती काढली जात आहे.

