सागफाटा रेल्वे लाईन डेटोनेटर लावणार्या रेल्वे कर्मचार्याला अटक
तपास यंत्रणेचा अहवाल आल्यानंतर होणार कारवाई
Railway employee arrested for planting Sagphata railway line detonator भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सागफाटा-डोगरगाव रेल्वे लाईनवर बुधवार, 18 सेना एक्सप्रेस येण्यापूर्र्वी 10 डेटोनेटर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. घातपात घडवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आल्यानंतर तपास यंत्रणेने रेल्वे कर्मचारी मोहंमद साबीर अली याला अटक केली असून न्यायालयाने त्यास 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीने 10 डेटोनेटर लावल्याची माहिती असून सुरक्षा यंत्रणांचा अहवाल आल्यावर रेल्वे प्रशासनाकडून मोहंमद अली यांच्यावर निलंबानाची कारवाई होईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
असे आहे नेमके प्रकरण
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा सेक्शनमध्ये येत असलेल्या सागफाटा ते डोंगरगाव दरम्यान बुधवार, 18 रोजी दुपारी 2.30 वाजता सेना एक्स्प्रेस येण्यापूर्वी संशयीताने दहा डेटोनेटर्स रेल्वे रूळावर लावले व एक्स्प्रेस येताच डेटोनेटर फुटल्याने रेल्वे गाडी येथे थांबविण्यात आली. रेल्वे लाईनीवर डेटोनेटर फुटल्याने रेल्वे लाईनीवर घातपात घडवण्याचा प्रकार झाल्याची चर्चा सर्वदूर पसरल्यानंतर मध्य प्रदेश सरकारची आयबी यंत्रणा, एटीएस (दहशतवादी विरोधी पथक) तसेच रेल्वे सुरक्षा बल या तिन्ही यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशीला सुरूवात करण्यात आली.

याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे कर्मचारी मोहंमद साबीर अली याला अटक केली आहे तर अन्य एकाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेकडून रेल्वे प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यावर मोहंदम अली यांच्यावर निलंबानाची कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले. अद्याप तपास यंत्रणेचे अधिकारी त्या कर्मचार्याची कसून चौकशी करीत आहे, त्याच्या सोबत कोण कोण होते, त्याने हे डेटोनेटर लावण्यामागील कारण काय आहे. याची सखोल चौकणी सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी करीत आहे.
