लेवा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण : भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळेंचा इशारा
भुसावळ (07 ऑक्टोबर 2024) : लेवा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास न झाल्यास उपोषणाचा इशारा त्यांनी पत्रकान्वये केली आहे. 6 सप्टेंबर 2024 रोजी मलबार हिल येथे लेवा पाटील समाजाच्या बैठकीत समाज मंडळातर्फे देण्यात आलेले समाज हिताच्या सर्व मागण्या त्वरित विधानसभा निवडणुकीची आचारसंहिते लागण्यापूर्वी पूर्ण करावी, अशी आशयाची मागणी पत्राद्वारे शिशिर जावळे यांनी केली आहे.
मुंबईत समाजबांधवांची बैठक
महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी मायक्रो ओबीसी संवाद अभियानांतर्गत 6 सप्टेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लेवा पाटीदार समाजातील विविध मंडळांचे व प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना सागर बंगला, मलबार हिल येथे ओबीसी संवाद बैठकीसाठी निमंत्री केले होते. या बैठकीत महाराष्ट्रातून लेवा समाज प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, भाजपा महामंत्री विजय चौधरी, आमदार राजूमामा भोळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष संजय गाते, भाजपाचे रावेर पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव शिशिर जावळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भरत महाजन यांच्यासह लेवा समाजातील विविध मंडळांचे अध्यक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

विविध मागण्यांची व्हावी पूर्तता
लेवा समाजाच्या विविध संस्था संघटनांतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांना समाजाच्या विकासासाठी व हिताच्या असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन विविध संस्था व संघटनांनमार्फत दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या अडी-अडचणी समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, भुसावळ, जळगाव, मलकापूर, बुलढाणा या विविध जिल्ह्यातून परिसरातून लेवा समाजबांधवानी आपले म्हणणे मांडले तसेच विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले. मागण्यांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी ले वा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व समाज सभागृहाची निर्मिती करणे, जामनेर तालुक्यातील वाघुर धरणास वैकुंठवासी हरिभक्त पारायण संत तोताराम महाराज गाडेगावकर यांचे नाव देणे, लेवा विकास आर्थिक महामंडळ स्थापन करणे, शेतकर्यांसाठी कोल्ड स्टोरेज, केळी क्लस्टर प्रोजेक्ट राबवणे, समाजातील विविध समस्यांचे निवारणासाठी समुपदेशन केंद्रांची स्थापना करणे, असोदा येथील बहिणाबाई स्मारकास वाढीव निधी उपलब्ध करून देणे, भुसावळ औद्योगिक वसाहतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आणणे, लेवा समाजाच्या सर्व शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्या दर्जा बहाल करणे, नॉन क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा वाढवणे तसेच ओबीसी शिष्यवृत्तीत वाढ करणे, यासह अनेक समाजाच्या हिताच्या संदर्भातल्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आचारसंहितेपूर्वी मागण्यांची व्हावी पूर्ती
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव तथा लेवा समाजाचे युवा नेतृत्व शिशिर जावळे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी केली असून तसे न झाल्यास उपोषणाचा इशारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. मागण्यांबाबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी , यांनी देखील पत्रव्यवहार केला आहे.




