भुसावळ टी पॉईंटवर नाकाबंदी करीत वाहनांची कसून तपासणी
यावल (26 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारनंतर पोलीस प्रशासन तसेच सैन्य दल पथकाच्या माध्यमातून भुसावळ टी पॉइंट येथे येणार्या-जाणार्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. वाहन तपासणी करण्यासाठी आलेल्या सैन्य दलाचे पथकामुळे या भागाला छावणीचे चित्र निर्माण झाले होते.
वाहनधारकांमध्ये खळबळ
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पोलीस प्रशासनाकडून देखील विविध भागात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. जिल्हाभरात अनेक ठिकाणी रोकड सापडली असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार अर्षद गवळी तसेच सैन्य दलाचे एक पूर्ण पथक या ठिकाणी तपासणीसाठी उपस्थित होते. भुसावळ टी पॉईंट येथे नाकाबंदी केल्यानंतर भुसावळकडे जाणारे त्याचप्रमाणे चोपडाकडे जाणारे व रावेरकडे जाणारे प्रत्येक वाहन या पथकाकडून तपासण्यात आले. शुक्रवारचा बाजार असल्याने या भागात प्रचंड गर्दी देखील होती. पोलीस आणि सैन्य दलाचे पथक या ठिकाणी एकत्र येऊन करत असलेल्या या कारवाईमुळे या भागात छावणीचे चित्र निर्माण झाले होते.

आर्दश आचारसंहितेचे पालन
शहर व तालुक्यातील विविध संवेदनशील भागावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नागरीकांनी व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे तसेच नागरीकांनी देखील कुठे गैरकृत्य होत असल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी केले आहे.
