‘बाजाराची दिवाळी’ : आज मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मीपूजन

कोट्यवधींची उलाढाल : झेंडू वधारला ; शहरातील बाजारपेठे तोबा गर्दी


भुसावळ (01 ऑक्टोबर 2024) : प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरातील बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली आहे. शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन असल्याने पूर्व संध्येलाच गुरुवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजा विधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांसह महिलांनी तोबा गर्दी केली. केरसुणी, लक्ष्मी मूर्ती, साळीच्या लाह्या, बत्ताशे, पानेफुले यासह कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीच्या माध्यमातून बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.

आज होणार उत्साही वातावरणात लक्ष्मीपूजन
शहरात दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन असल्याने पूर्व संध्येलाच शहरातील बाजारपेठ गजबजली होती. केरसुणी, लक्ष्मी मूर्ती, साळीच्या लाह्या, बत्ताशे, पानेफुले यासह कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दिवसभरात खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी शहरातील दुकानेही आकर्षकरीत्या सजवण्यात आली. दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परीधान केलेल्या कुटुंबीयांनी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले.

बाजाराला पावली दिवाळी
शुक्रवारी लक्ष्मी पूजन असल्याने पूर्वसंध्येलाच नागरिकांसह महिलांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांनी दुकाने थाटली. केरसुणी, साळीच्या लाह्या, पूजेसाठी लागणारी पाच फळे, रांगोळ्या, लक्ष्मीची पावले, लक्ष्मी मूर्ती आदींची दुकाने थाटण्यात आली होती शिवाय कपडा मार्केटमध्येही तेजी दिसून आली. सणासाठी रेडिमेड कपडे, साड्या खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी या सोबतचे सोन्याच्या वस्तूंसह दुचाकी व चारचाकींच्या वाहनांचे बुकींगही करण्यात आले व लक्ष्मी पूजनाने नवी वाहने दारापुढे आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भुसावळच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने ग्रामस्थ दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात दाखल झाले होते. शहरात तीन ते चार लाख पणत्यांची विक्री झाली व त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.

कमळासह झेंडूची फुले भाव खावून
लक्ष्मी पूजनासाठी लागणारी कमळाची फुले मोठ्या संख्येने नागरीकांनी विकत घेतली. 10 रुपयांप्रमाणे फुलांची विक्री झाली तर त्यासाठी अहमदाबाद व इंदूर येथून विक्रेते शहरात आले होते. झेंडूच्या फुलांनादेखील मोठी मागणी राहिली. 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे झेंडूचा दर राहिला. पूजेसह वाहनांना व दुकानांना दर्शनी भागात हार लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यात आली. कुंभार बांधवांनी लक्ष्मी मूर्तीची दुकाने लावली होती तर परराज्यातूनही आकर्षक मूर्ती विक्रीसाठी स्थानिक विक्रेत्यांनी आणल्या होत्या. शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत दर राहिले.

कोट्यवधींची उलाढाल : व्यापारी सुखावले
प्रकाश पर्वाच्या उत्सवात सर्वच व्यावसायीकांना दीपावली पावल्याचे चित्र राहिले. शहरातील कपडा मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली तर अनेक दुकानांबाहेर ग्राहक वेटींग रांगेत दिसले तर छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये तोबा गर्दी झाली होती या शिवाय सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ राहिली. शहरात दिवाळीच्या मुहूर्तावरही अनेकांनी विविध कंपन्यांच्या दुचाकीसह बुलेटची तसेच कारची खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या दुकानातून एलईडीसह फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, डीश वॉशर खरेदी करण्यात आले शिवाय त्यासाठी फायनान्ससह आकर्षक सुटही देण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !