बसच्या धडकेत शेतकर्‍यासह बैलांचा मृत्यू


धरणगाव (2 नोव्हेंबर 2024) : बसने दिलेल्या धडकेत शेतकर्‍यासह त्यांच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. गोपाल केशव अहिरे (67) असे मयताचे नाव आहे. दिवाळी सुरू होताच घरातील कमावत्या व्यक्तीचा अपघात झाल्याने त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. जांभोरे येथील शेतकरी शेतातील काम आटोपून घरी जात असताना मागवून येणार्‍या बसने धडक दिली.

शेतात येताना अपघात
धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील शेतकरी गोपाल अहिरे हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. पारोळा ते धरणगाव रस्त्यावरुन जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक ते धरणगाव बस (एम.एच.20 बी.एल.3363) ने शेतकरी गोपाल अहिरे यांच्या बैलगाडीला मागाहून जबर धडक दिली. यात बैलगाडीचा चुराळा होऊन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीवरील शेतकरी गोपाल अहिरे हे गंभीर जखमी झाले होते.

या अपघातानंतर अहिरे यांना त्यांचे लहान भाऊ नाना अहिरे यांनी तत्काळ धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेने हलवण्यात आले परंतु गोपाल अहिरे यांच्या डोक्याला आणि कमरेला तसेच पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी बस चालकासह वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गोपाल अहिरे हे शेती व्यवसाय करायचे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परीस्थिती हालाखीची असून तसेच घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबीय हतबल झाले असून दिवाळी साजरी करण्याआधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या कुटुंबाला संबंधित विभागाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी या वेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. दरम्यान, मृत शेतकरी गोपाल अहिरे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी गोपाल अहिरे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !