भुसावळात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ (2 नोव्हेंबर 2024) : भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून शहरात साजरी करण्यात आली. समस्त लेवा पाटीदार समाज भुसावळ परिसरतर्फे गुरूवारी सकाळी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सुमारे 500 महिला-पुरूषांनी सहभाग नोंदविला.
शहरातून निघाल्या सात मिरवणुका
जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातून सात मिरवणुका काढण्यात आल्या. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरातील नाहाटा कॉलेजजवळून गुरूवारी सकाळी आठ वाजता मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सुमारे 500 समाज बांधवांनी सहभाग घेतला. यात महिलांची संख्या सुमारे 200 होती. पु.ओं.नाहाटा कॉलेजपासून सुरू झालेली रॅली ही जामनेर रोडने अष्टभुजा देवी, पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील बोगद्यातून हंबर्डीकर चौक, शहर पोलीस ठाणे, गांधी पुतळा, तहसील कार्यालयावरून जळगाव रोडने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी डोक्यात भगव्या टोप्या घातल्या होत्या. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या रॅलीत, महिला, युवती, युवकासह समाजबांधव उपस्थित होते. या रॅलीचा समारोप नऊवाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
शहरातून संध्याकाळी सात मिरवणुका
शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड, जुना सतारा परिसर, गंगाराम प्लॉट भाग, नाहाटा चौफुली परिसर, वांजोळा रोड भाग, मुन्सीपल पार्क भाग, वेडी माता मंदिर परिसरातून मिरवणुका काढण्यात आल्यात. या मिरवणुका संध्याकाळी सहा ते दहा अशा चार तास सुरू होत्या. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.
या मंडळांनी घेतला सहभाग
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरातून जय लेवा ग्रुप, गंगाराम प्लॉट भाग, श्रीराम प्रतिष्ठान, लेवा प्रतिष्ठान, जुना सातारा भाग, वेडी माता मंदिर भाग, लेवा साम्राज्य यांनी सहभाग घेतला होता. या मंडळांतर्फे मिरवणूका काढल्या होत्या.
वंदे मातरमच्या घोषणा
मोटर सायकल रॅलीच्या सर्वात पुढे भारताचा तिरंगा ध्वज घेऊन मोटर सायकल होती, त्या मागे अन्य गाड्या होत्या. मोटर सायकलस्वारांनी वंदे मातरम, भारत माता की जय आदी घोेषणा देत परिसर दणाणला. यावेळी शहरातील बहुसंख्य समाज बांधव, महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.




