सावद्यात विविध मंदिरात अन्नकुट महोत्सव उत्साहात
Annakut festival in various temples in Sawada सावदा (4 नोव्हेंबर 2024) : शहरातल दीपावली पाडव्याच्या महूर्तावर विविध मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदादेखील अन्ननकुट महोत्सव व गोवर्धन पूजन करण्यात आली. सावदा येथील स्वामीनारायण मंदिर, स्वामीनारायण गुरुकुल तसेच गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला. 110 वर्ष पुरातन अश्या स्वामीनारायण मंदिरात शनिवार, 2 रोजी सकाळी 10 वाजता गोवर्धन पूजन तसेच अन्नकुट उत्सव व महाआरती असे धार्मिक कार्यक्रम झाले.
मंत्री रक्षा खडसे उपस्थित
मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाशदासजी, अनंत प्रकाशदासजी यांच्यासह संत मंडळी उपस्थित होती. यावेळी संतांचे आशिर्वचन झाले. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. त्यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यानंतर येथे महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले. याचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. दुपारी चार वाजता सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुलातदेखील अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरतीनंतर संतांची प्रवचने झाली यात सोमवारगिरी मठी सावदाचे महंत कृष्णगिरीजी महाराज, सावदा येथील महानुभाव मंदिराचे महंत सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा, फैजपूर येथील खंडेराव मंदिराचे महंत पुरुषोत्तमदासजी महाराज, शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, शास्त्री अनंत प्रकाशदासजी, यावल स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री राजेंद्र प्रसाददासजी, मालोद मंदिराचे कोठारी प्रभू स्वामी, खर्डी येथील प्रदीप महाराज पंजाबी आदी उपस्थित होते. यावेळी भुसावळ येथील संजय सावकारे, अमोल जावळे, डॉ.केतकी पाटील, डॉ.व्ही.जे.वारके. कथाकथनकार प्रा.व.पू. होले, रेखा वानखेडे, स्वामीनारायण गुरुकुलचे संस्थेचे संचालक पी.डी.पाटील, मुख्याध्यापक वाघूळदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संस्कृती टिकवण्यासाठी जागृत राहणे गरजेचे
उपस्थित संतांनी आपले प्रवचनात आपली हिंदू संस्कृती टिकवायची असेल तर आता आपणास जागृत रहावे लागेल. आपली संस्कृती मिटविण्यासाठी अनेक प्रयत्न होत असून त्यांना आपण यशस्वी होऊ देऊ नका यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा व योग्य लोकांना जे धर्मास साथ देतील त्यांना आपण साथ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी येथे विविध गावाहून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. गांधी चौकातील विठ्ठल मंदिरातदेखील अन्नकुट महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवास 56 भोग नैवेद्य दाखविण्यात आला. माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, भक्त उपस्थित होते.
