भुसावळात रात्री 10.30 नंतर पानटपर्या, हॉटेल्ससह प्रतिष्ठाने सुरू असल्यास दाखल होणार गुन्हा
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे : निवडणूक विभागाची पत्रकार परिषद
भुसावळ (6 नोव्हेंबर 2024) : निपक्ष व निर्भयपणे निवडणुका पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून शहर व तालुक्यात रात्री साडेदहा नंतर प्रतिष्ठाने, हॉटेल्स, पानटपर्या व अन्य दुकाने सुरू असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.
हद्दपारीचे नऊ प्रस्ताव ः 11 संशयीत स्थानबद्ध
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले की, आतापयर्र्ंत हद्दपारीचे नऊ प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले असून सात प्रस्तावांवर आपल्याकडे चौकशी सुरू आहे. 11 उपद्रवींवर आतापर्यंत स्थानबद्ध (एमपीडीए) ची कारवाई करण्यात आली असून सीआरपीसीच्या 405 कारवाया करण्यात येणार असून त्यातील 60 टक्के कारवाया झाल्या आहेत. 110 प्रमाणे 19 गुन्हेगारांवर कारवाया करण्यात येणार असून 144/2 प्रमाणे 94 उपद्रवींना 15 ते 23 नोव्हेंबरदरम्यान बंदी घालण्यात येणार आहे. 149 ची नोटीस 290 जणांना देण्याची प्रक्रिया सुरू असून अवैध दारू विक्री करणार्या 34 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

तीन स्थिर पथकांकडून तपासणी
कृष्णात पिंगळे म्हणाले की, शहराच्या विविध दिशांमध्ये तीन स्थिर पथकांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसून तपासणी केली जात आहे. 24 तासात दोन शिप्टमध्ये पोलीस कर्मचारी येणार्या-जाणार्या तसेच संशय असलेल्या वाहनांची कसून तपासणी करीत आहेत. 85 वाहन धारकांकडील शस्त्र जमा करण्यात आले असून अवैध दारू पोटी पाच लाख 93 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच असभ्य वर्तन करणार्या तीन लोकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत.
आचारसंहिता भंगाची तक्रार नाही
निवडणूक अधिकारी व प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले की, आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी केली जात असून अद्यापपर्यंत आचारसंहिता भंगाची एकही तक्रार दाखल झालेली नाही. निवडणूक कर्मचार्यांच्या सर्व सुट्या 23 पर्यंत रद्द करण्यात आल्या असून या काळात कुणी दांडी मारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे संकेत त्यांनी दिले. जात व धर्माच्या अनुषंगाने कुणीही मतदार, उमेदवाराने भाषणे करू नये, असेही त्यांनी सांगितले.
आजपासून वोटर स्लीपचे वाटप
तहसीलदार निता लबडे म्हणाल्या की, बुधवार, 6 नोव्हेंबरपासून वोटर स्लीपचे घरोघरी जावून बीएलओ वाटप करतील. ताप्ती स्कूलमध्ये 8 रोजी टपाली मतदान होईल व त्यानंतर 17 ते 19 दरम्यान उपविभागीय कार्यालयात टपाली मतदानाची सोय असेल. 12 पासून गृह मतदान सुरू होणार असून त्यासाठी 23 अर्ज प्राप्त असून 20 टीम नियुक्त करण्यात आल्या असून यातील तीन रिझर्व्ह आहेत. 14 ते 17 दरम्यान ईव्हीएम मशीन सीडींग केले जाईल तर 19 रोजी पोलिंग पार्टीला ते तहसील कार्यालयातून वाटप (डिस्पॅच) केले जाईल.
एका स्थानबद्ध कैद्यालाही मतदानाचा अधिकार
ठाणे कारागृहात स्थानबद्ध असलेल्या कैद्याला मतदान करता येणार आहे. यासाठी पोस्टल बॅलेट कैद्यापर्यंत नेले जाणार असल्याचे नायब तहसीलदार प्रीती लूटे म्हणाल्या. पोलीस, होमगार्ड, नगरपालिका सफाई कर्मचार्यांच्या मतदान प्रक्रियेची यावेळी त्यांनी माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार निता लबडे, गटविकास अधिकारी सचिन पानझडे, शहर निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह नोडल ऑफिसर व निवडणुकीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




