ऊस कारखानदारांच्या हातातून महाराष्ट्र वंचितांच्या हातात देण्याची वेळ : भुसावळात सुजात आंबेडकर
भुसावळ (7 नोव्हेंबर 2024) : ऊस कारखानदारांच्या हातातील महाराष्ट्राची सत्ता आता वंचितांच्या हातात देण्याची वेळ आली आहे. निवडणूक काळात तुम्हाला अनेक आमिषे मिळतील, तुमच्या दारापर्यंत दलाल पैसे, दारू, मटण आणतील मात्र त्यांना पळवून लावा व वंचित आघाडीचे उमेदवार जगनभाऊ सोनवणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन वंचित आघाडीचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष सुजात आंबेडकर यांनी केले. शहरातील नेहरू मैदानावर गुरुवारी दुपारी त्यांची वंचितचे उमेदवार जगनभाऊ सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
वंचितांची सत्ता येणार
वंचित बहुजन पार्टी हा सर्वसामान्यांसाठी झटणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तुमच्या-आमच्यातील लोकांना पक्षाने तिकीट दिले आहे. अगदी रावेरच्या जागेवर शमिभा पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला पक्षाने तिकीट दिल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले.

वंचित आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यात नवीन उद्योग, प्रकल्प आणले जातील, एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण करू, असे आश्वासनही सुजात यांनी यावेळी दिले. काही लोक तुमच्या घरापर्यंत येवून वंचित म्हणजे वोट कटर म्हणतील मात्र असल्या प्रचाराला बळी पडू नका व जगन सोनवणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे, रवी सपकाळे, निर्मिती जगन सोनवणे, वंदना सोनवणे, युवराज नरवाडे, आरीफ सोनवणे, राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, अनिल सुरवाडे, सचिन बार्हे, सुरेश कोलते, प्रमोद फिरके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




