मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या : शरद पवार


मुक्ताईनगर (11 नोव्हेंबर 2024) : महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे 400 खासदार हवे असल्याचे सांगत असताना नागरिकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घटना बदलता येणार नाही, अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी सर्व एकत्र आले, इंडिया नावाची आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं, तुम्ही साथ दिली व राज्यात 31 खासदार निवडून आले. वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही, असे शरद पवार म्हणाले. मुक्ताईनगरातील महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते. रोहिणी खडसे यांना मतदारसंघाचे चित्र बदलण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील सत्तेचा दुरुपयोग
शरद पवार म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण गेल्या अडीच वर्षात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा उपयोग केला गेला नाही. कशासाठी सत्तेचा उपयोग केला गेला ? हे आपण बघितले. शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या सहा- सात महिन्यात राज्यात 856 शेतकर्‍यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या. या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्या. उद्योगपतींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले पण शेतकर्‍यांचे का केले नाही ? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. शिवरायांच्या या राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली, तरुणांच्या हाताला रोजगार नाही हे चित्र बदलायचे आहे त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे असे शरद पवार म्हणाले.


महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कर्ज माफ
महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली तर महालक्ष्मी योजनेंतर्गत राज्यात स्त्रियांना महिन्याला तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास लागू केला जाईल. शेतकर्‍यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ केले जाईल, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. बेरोजगार तरुणांना काम मिळेपर्यंत महिन्याला चार हजार रुपये दिले जातील प्रत्येक कुटुंबाचा पंचवीस लाखा पर्यंत आरोग्य विमा काढला जाईल. हे सर्व राबवण्यासाठी मतदानातून साथ द्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी जनतेला केले. विशाल महाराज खोले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची सभेला उपस्थिती होती.

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सभा
महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार शिरीषदादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रवींद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, डॉ.जगदीश पाटील, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे, भुसावळचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार अ‍ॅड.धनंजय चौधरी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते उपस्थित होते.

रोहिणी खडसेंचा विजय निश्चित : रवींद्र पाटील
अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील म्हणाले की, अ‍ॅड.रोहिणी खडसे या गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले, त्यांचा विजय निश्चित आहे. अ‍ॅड.रोहिणी खडसे, डॉ.राजेश मानवतकर, अ‍ॅड.धनंजय चौधरी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

मुक्ताईनगर मतदारसंघात गुंडगिरी वाढली : एकनाथराव खडसे
आमदार एकनाथराव खडसे यांनी महायुतीच्या काळात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले, महागाई वाढली, तरुणांना रोजगार देणारे उद्योग इतर राज्यात पळवले गेल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव नाही हे चित्र बदलण्यासाठी महविकास आघाडीचे सरकार आणण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले. मुक्ताईनगर मतदारसंघ विकासात मागे पडला असून, मतदारसंघांत गुंडगिरी वाढली असून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेणार : अ‍ॅड.रोहिणी खडसे
रोहिणी खडसे म्हणाल्या की, गत निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला तरी गेले पाच वर्ष सतत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत राहिले. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या, शेतकर्‍यांच्या कष्टकर्‍यांचा प्रश्नांसाठी आंदोलने केली, निवेदने दिली. जनसंवाद यात्रा काढून जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्वांची साथ लाभली. ती कायम ठेवून आपल्याला मतदान करण्याचे रोहिणी खडसे यांनी जनतेला आवाहन केले. निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याला आपले पहिले प्राधान्य असेल, असेही त्या म्हणाल्या. उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेऊन शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, पर्यटन विकास करून व उद्योग धंदे आणून तरुणांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न राहिल त्यासाठी निवडून देण्याचे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !