भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर उपनिरीक्षक अद्यापही पसारच
30 हजारांचे लाच प्रकरण : खाजगी पंटराला मात्र एसीबीकडून बेड्या
Bhusawal State Excise Department’s corrupt sub-inspector still at large भुसावळ (24 नोव्हेंबर 2024) : अवैधरित्या विक्री होणार्या दारूची केस न करण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याप्रकरणी भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण सोनवणे (सध्या रा.भुसावळ) व खाजगी पंटर किरण माधव सूर्यवंशी (37, हुडको कॉलनी भुसावळ) यांच्याविरोधात फैजपूर पोलिसात दोन दिवसांपूीर्व गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, लाचेचा संशय येताच उपनिरीक्षक सोनवणे पसार झाल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना अद्यापही त्याचा तपास लागला नाही तर एसीबीने मात्र खाजगी पंटराला मात्र अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील 35 वर्षीय तक्रारदार यांच्याकडे 19 नोव्हेंबर रोजी उपनिरीक्षक किरण सोनवणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेण्यात आले व त्यानंतरही दारूची केस न करण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची मागणी करण्यात आली. 22 रोजी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50 हजारांची मागणी करीत 30 हजार स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता फैजपूर येथे खाजगी पंटर किरण सूर्यवंशी यास अटक करण्यात आली मात्र ट्रॅपची कुणकुण सोनवणे यांना लागताच ते पसार झाले.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. दरम्यान, सोनवणे हे दोन दिवसांपासून पसार असून त्यांचा अद्यापही शोध लागला नसल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
