अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या मंगरूळातील तरुणाचा खून : पत्नीसह प्रियकराला बेड्या

अमळनेर पोलिसांसह गुन्हे शाखेकडून सहा तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल : जळगावात पोलीस अधीक्षकांची माहिती


Murder of a young man in Mangrula who was an obstacle to an immoral relationship: Wife and lover handcuffed जळगाव (6 डिसेंबर 2024) : अनैतिक संबंधात अडसर ठरू पाहणार्‍या तरुणाचा शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी खून झाल्याची बाब समोर आली होती. जळगाव गुन्हे शाखा व अमळनेर पोलिसांनी सहा तासात गुन्ह्याची उकल करीत प्रियकरासह त्याची प्रेयसी व मयताची पत्नी यांना अटक केली आहे. तुषार चिंधू चौधरी (37, रा.मारवड, ता.अमळनेर ह.मु. प्रताप मील, अमळनेर) असे खून झालेल्या तरुणाचे तर सागर चौधरी (35, रा.दोंडाईचा, जि.धुळे) असे प्रियकर आरोपीचे व पूजा तुषार चौधरी (प्रताप मिल, अमळनेर) असे अटकेतील पत्नी व प्रेयसीचे नाव आहे.

असे आहे खून प्रकरण
अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पूजासह वास्तव्याला होता. गुरुवार, 5 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेला व दोघांनी मद्य प्राशन केले व त्याचवेळी नशेत दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निर्घृण खून करीत पळ काढला. रात्री उशिरापर्यंत तुषार हा घरी न आल्याने शोध सुरू असतानाच शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळला. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

डोक्यात गंभीर घाव
तुषारच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून शिंदखेडा येथून अटक करण्यात आली. चौकशीत हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली आरोपीने दिल्यानंतर मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला देखील ताब्यात घेण्यात आले. मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (55, रा.मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यांनी केली खुनाच्या गुन्ह्याची उकल
अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास शिंदे, मिलिंद सोनार, अमोल पाटील, निलेश मोरे, शेखर साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, होमगार्ड पूनम हटकर आदींच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !