भुसावळात कर्जबाजारी जावयानेच सासर्याकडे केली 28 लाखांची घरफोडी
घरफोडीची बाजारपेठ पोलिसांकडून उकल : 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
In Bhusawal, a debt-ridden son-in-law committed a house burglary worth Rs 28 lakhs at his father-in-law’s house. भुसावळ (6 डिसेंबर 2024) शहरातील शिवशक्ती कॉलनी जवळील सोमनाथ नगरात सोमवारी भर दिवसा धाडसी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली होती. बाजारपेठ पोलिसांनी सखोल तपासाअंती या घरफोडीची उकल केली असून तक्रारदाराचा जावई या घटनेत आरोपी निघाला आहे. आरोपीला बोलते केल्यानंतर त्याने कर्ज बाजारी झाल्याने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. 28 लाख 55 हजारांच्या घरफोडी प्रकरणी आरोपीच्या ताब्यातून 21 लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जळगावात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी सायंकाळी दिली. राजेंद्र शरद झांबरे (फेकरी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
खलबत्त्यातून लांबवले दागिणे
शहरातील लोखंडे वाडा, शिवशक्ती कॉलनीजवळील सोमनाथ नगरातील रहिवासी व इलेक्ट्रीशीयन अनिल हरी बर्हाटे हे सेवानिवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नीसोबत पुतण्याच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी शहरातील वांजोळा रोड, मिरची ग्राऊंड परिसरात आल्याने चोरट्यांनी सोमवारी दुपारी पावणेतीन वाजेनंतर संधी साधली होती. 25 तोळ्यांचे दागिणे व एकूण तीन लाख 80 हजारांची रोकड चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून लांबवली होती. विशेष म्हणजे स्नानगृहाच्या वरील अडगळीच्या जागेत ठेवण्यात आलेल्या खलबत्त्यातून चोरट्यांनी दागिणे लांबवल्याने ही चोरी माहितगाराने केल्याचा सुरूवातीपासून यंत्रणेला संशय होता व तो खरा ठरला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, नाईक सोपान पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल जावेद शहा आदींच्या पथकाने केली.
दागिणे, रोकड लॉकरमध्ये सुरक्षित : पोलीस उपअधीक्षक
लाखो रुपये किंमतीचे दागिणे तसेच मोठ्या प्रमाणावर रोकड नागरिकांनी घरात न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले आहे. नागरिकांनी बाहेरगावी जाताना नजीकच्या पोलिसांनाही सूचित करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

