विद्यार्थी जागृत झाल्यास कुटूंबही जागृत होईल : प्रा.प्र.ह.दलाल
भुसावळ तहसील कार्यालयात ग्राहक दिन उत्साहात
भुसावळ (27 डिसेंबर 2024) : ग्राहक दिन केवळ औपचारिक पद्धतीने साजरा न करता शाळा महाविद्यालयात करण्यात यावा कारण एक विद्यार्थी जागृत झाला तर एक कुटुंब जागृत होवू शकते. आज अनेक प्रकारे ग्राहकांची लुबाडणूक व फसवणूक होते पण ग्राहक तक्रार करीत नाही. तक्रारींचा उपयोग होत नाही, उगाच वाईटपणा का घ्यावा ह्या मानसिकतेतून ग्राहक बाहेर यायला हवा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणे गरजेचे आहे. सेल अथवा एकावर एक फ्री अश्या प्रलोभनाला बळी पडू नये. शासकीय अधिकार्यांनी सुद्धा ठराविक साचेबंद पद्धतीने असे कार्यक्रम न करता जनजागृती हे ध्येय ठेवले तर ह्या दिवसाचे खरे औचित्य, खरा हेतू साध्य होईल, असे विचार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, दक्षता समिती व ग्राहक पंचायत जळगाव माजी जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी येथे व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
भुसावळ तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन झाला. तहसीलदार नीता लबडे यांनी पुष्पगुच्छ देवून दलाल यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नीता लबडे होत्या. प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक रोशनी यांनी केले. नायब तहसीलदार घुले यांनी आभार मानले.










