नंदुरबार शहर पोलिसांची गोवंश मांस विक्रीवर कारवाई : दोघांविरोधात गुन्हा
नंदुरबार (10 ऑगस्ट 2026) : नंदुरबार शहरातील अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान बागवान गल्ली परिसरात गोवंशीय जनावराचे मांस विक्रीसाठी ठेवणार्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 40 किलो गोवंशीय मांस, तीन लोखंडी सुरे, दोन लोखंडी कुर्हाडी आणि एक वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर गोवंशाची कत्तल करणार्या संशयीताविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीवरून पोलिसांचा छापा
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बागवान गल्ली परिसरात गोवंशीय जनावराचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने शाळा क्रमांक 9 च्या मागील टेकडीवरील एका खोलीवर सोमवारी सकाळी सुमारे 10.05 वाजता छापा टाकला. यावेळी एक इसम मांस विक्री करताना आढळून आला. चौकशीत त्याने आपले नाव कुरेशी नुर मोहम्मद शेख रफिक (वय 30, रा. धानोरा रोड, घोडापीर मोहल्ला, नंदुरबार) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला.




कत्तल करणार्या संशयिताचा शोध सुरू
प्राथमिक चौकशीत सदर मांस सलीम मुसा उर्फ सल्या (रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) याने गोवंशाची कत्तल करून विक्रीसाठी दिल्याचे, तर कुरेशी नुर मोहम्मद शेख रफिक याने ते विक्रीसाठी घेतल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कत्तल करणार्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5, 5(क), 9(अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे, अमोल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल राठोड, अमित भरवाड, ललित गवळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबाबाई वाघमोडे व पोलीस पथकाने केली.
अवैध कृत्यांविरोधात माहिती देण्याचे आवाहन
नंदुरबार शहर पोलिसांकडून अवैध कृत्यांविरोधातील कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असून, नागरिकांनी परिसरातील संशयास्पद अथवा अवैध प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन शहर निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.