भुसावळात तृतीयपंथीयावर चाकूने हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा
Transgender Person Attacked With Knife in Bhusawal’s Muslim Colony; Four Booked भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राहणार्या किन्नरावर (तृतीयपंथी) घरात घुसून मारहाण करत चाकूने जखमी करण्यात आले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भिक्षा मागण्याचा वाद
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान अतुल पांडे उर्फ दीपक वंशकार (24, व्यवसाय भिक्षुकी – किन्नर, रा. प्लॉट नं. 12, मुस्लिम कॉलनी, बडी खानका मागे, भुसावळ) यांच्या तक्रारीनुार, त्या आपल्या मैत्रिणी सौम्या यादव व रुक्षा सिंग यांच्यासह शमशाद इब्राहीम खान यांच्या घरात मागील सुमारे पाच महिन्यांपासून भाड्याने राहतात. त्या दररोज भुसावळ ते रावेर दरम्यान रेल्वेत भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात.




बाबा काल्यासह चौघांविरोधात गुन्हा
तक्रारीनुसार, रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास त्या घरात जेवण बनवत असताना अर्षद (पूर्ण नाव अज्ञात), बाबा काल्या (पूर्ण नाव अज्ञात) व त्यांच्या सोबत दोन अनोळखी तरुण घरात आले. यावेळी बाबा काल्याने तु मेरे रेल में काम करते जा, असे सांगितले. त्यास नकार दिल्याने आरोपी संतापले. यानंतर आरोपींनी तक्रारदारास चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अर्षदने त्यांच्या डाव्या गालावर चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या व रक्तस्राव झाला. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या सौम्या यादव यांनाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली तसेच आमच्या रेल्वेत काम करा, अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
घटनेनंतर जखमी अवस्थेत तक्रारदार पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांनी तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी मेमो देत त्यांना दवाखान्यात पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी अर्षद, बाबा काल्या व त्यांचे दोन साथीदार (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर तडवी करीत आहेत.