दोन लाखांचे लाच प्रकरण : बहाळ सरपंचासह तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी
Two lakh rupees bribe case : Bahal sarpanch and three others remanded in police custody for one day चाळीसगाव (27 डिसेंबर 2024) : शेत जमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कोर्ट कचेर्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात पाच लाखात तडजोड केल्यानंतर पहिल्या टप्प्याचे दोन लाख रुपये स्वीकारताना बहाळ, ता.चाळीसगाव येथील सरपंच राजेंद्र महादू मोरे (57), ग्रामपंचात शिपाई शांताराम तुकाराम बोरसे (50) व खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे (40) यांना गुरुवारी दुपारी धुळे एसीबीने अटक केली होती. आरोपींना शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
70 वर्षीय तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे, ता.चाळीसगाव येथे गट क्रमांक 57/2 क्षेत्र 1 हेक्टर 64 आर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला मात्र सरपंच यांनी कोर्ट कचेरीचा त्रास होवू न देण्यासाठी दहा लाख रुपये लाच मागून पाच लाखात तडजोड केली. लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये देण्याचे गुरुवार, 26 रोजी निश्चित केल्यानंतर सापळा रचून सरपंच, शिपाई व खाजगी पंटराला पकडण्यात आले.
आरोपींना एका दिवसाची कोठडी
धुळे एसीबीने अटक केलेल्या सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम बोरसे व पंटर सुरेश सोनू ठेंगे यांना शुक्रवारी दुपारी जळगाव न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.


