आईसोबत अनैतिक संबंध : अल्पवयीनाने मित्रांच्या मदतीने केला खून

सांगली (23 फेब्रुवारी 2025) : आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचे कळाल्यानंतर अल्पवयीनाने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांची मदत घेत आईच्या प्रियकराचा खून केला. दत्ता शरणाप्पा सुतार (वय 30, मूळ रा. इंदिरानगर, सध्या रा. शिवशंभो चौक) असे मृताचे नाव आहे. तिघा अल्पवयीन युवकांनी एडक्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांत खुनाचा छडा लावत तिघांना ताब्यात घेतले.
काय घडले नेमके
मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार म्हणून सळ्या बांधण्याचे काम करत होता. त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुली आहेत. कुटुंबासह तो इंदिरानगर परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसनही होते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात एका महिलेशी अनैतिक संबंध जुळून आले. ती महिला अल्पवयीन मुलासह राहत होती. दत्ता याच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीने त्याला जाब विचारला. पत्नीशी सतत वाद होऊ लागला. त्यामुळे तो गेली दीड ते दोन वर्षे महिलेच्या घरातच तिच्या मुलासह शिवशंभो चौक परिसरात राहत होता.
महिलेचा मुलगा लहान असल्यामुळे सुरुवातीला त्याला समज नव्हती; परंतु नंतर आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध पाहून मुलाला दत्ताचा राग येत होता. बरेच दिवस तो राग सहन करून थांबला होता. गुरुवारी दुपारी तो दोन अल्पवयीन साथीदारांसह कदमवाडी परिसरात घोडी चरायला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने दत्ताला पैसे पाहिजेत म्हणून कदमवाडी रस्त्यावर बोलवून घेतले.
