वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

न्यूज डेस्क । पुणे (26 फेब्रुवारी 2025) : ताई, सातारची बस तिकडे लागली आहे म्हणत विश्वास संपादन करीत नराधमाने तरुणीला शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. ही संतापजनक घटन स्वारगेट बसस्थानकात बुधवारी पहाटे घडली.
काय घडले नेमके
पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. आरोपी पीडित तरुणीला म्हणाला ताई कुठे चाललीस? त्यावर मुलीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी म्हणाला, सातारची बस इथे लागत नाही, ती तिकडे लागलेली आहे. त्यावर तरुणी म्हणाली, नाही. बस इथेच लागते. म्हणूनच मी इथे बसली आहे. त्यावर आरोपी पुढे म्हणाला, बस तिकडे लागली आहे. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता.
हा अंधार पाहून तरुणीने आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला, ही रात्री उशिराची बस आहे. लोक झोपलेले आहेत. त्यामुळे लाईट बंद आहे. तू वरती चढून मोबाईलची टॉर्च लावून चेक करू शकते. त्यानंतर पीडित तरुणीने बसमध्ये चढून टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आरोपीने बसचा पाठीमागून दरवाजा बंद केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला व पळ काढला.
तरुणीने आपल्या मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. मित्राने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला, यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून वेगवेगळ्या पथकांमार्फत शोधमोहीम सुरू केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
