अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या पतीला तलावात फेकताना प्रियकरही बुडाला

कुसळंब (26 फेब्रुवारी 2025) : प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या पतीला संपवण्याचा डाव आखला. पतीला तलावात फेकताना पतीने प्रियकराचा गळा धरल्यानंतर प्रियकरही पाण्यात बुडून मयत झाला. ही धक्कादायक घटना ढाळे पिंपळगाव तलावात घडली.
प्रेयसीला पोलिसांकडून अटक
पांगरी पोलिसांनी मयत गणेश अनिल सपाटे (26, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (35) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत प्रेयसी रुपालीला अटक केली. महागाव (ता.बार्शी) येथील ढाळे पिपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी खोलवर तपास केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
19 फेब्रुवारी रोजी पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. तपासादरम्यान, साक्षीदार गणेश खरात याने काही महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला. गणेश सपाटे व साक्षीदार गणेश खरात हे मित्र होते. सपाटे याने या मित्रापुढे नातेवाइकाच्या पत्नीसोबत संबंध असल्याचे सांगून तिचा नवरा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला ठार मारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश सपाटे, त्याचा मित्र गणेश खरात आणि शंकर पटाडे हे तिघे मिळून दारू पार्टीसाठी बार्शी तुळजापूर रोडवरून बावीच्या पुढे गेले. रात्रीच्या वेळी तिघेजण महागावच्या पुलाजवळ पोहोचले. दोघेजण पुलावर गप्पा मारत उभे होते.
