साईंच्या दर्शनाला निघालेल्या जोडप्याचा अपघाती मृत्यू

Accidental death of couple on their way to Sai Baba’s darshan न्युज डेस्क । छत्रपती संभाजीनगर (12 मे 2025) : हैदराबाद येथून ते शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या कारला भरधाव हायवाने धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडला.
धुळे-सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

या अपघातात हैदराबाद येथील दांपत्याचा मृत्यू झाला. हैदराबाद येथून ते शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असतानाच हा अपघात झाला. जी रामू (45), जी माधुरी (40) असे मृतांचे नाव आहे. तर श्रीवाणी (41), अनुषा (17), मेघना (12), ऋषिकेश (07), नागेश्वर राव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हैदराबाद येथील हे कुटुंब किया कॅरेन्स या गाडीने रविवारी दुपारी 12 वाजता शिर्डीसाठी निघाले होते. तिथून येत असताना धुळे सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने विना नंबरप्लेटच्या भरधाव हायवाने कारला जोराची धडक दिली. यात दोघांचा दुर्दैवी अंत झाला.
