पेच संपला : मविआकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार असल्याची आदित्य ठाकरेंची घोषणा

शरद पवार गटाचा पाठिंबा पण काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष


Stalemate Ends : Aditya Thackeray Announces Ambadas Danve to Head to Legislative Council on behalf of MVA मुंबई (29 एप्रिल 2026) : महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले असून त्याबाबतची घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केली. दरम्यान, राष्ट्रवादीचा या निर्णयाला पाठिंबा असलातरी आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंऐवजी दानवेंच्या नावाची घोषणा
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार व्हावे, अशी भूमिका वारंवार मांडली होती मात्र उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाऐवजी पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय
उद्धव ठाकरे यांनी 2020 साली विधान परिषदेवर प्रवेश केला होता आणि त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू असताना, ठाकरेंनी अंबादास दानवेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा शिवसैनिकाला दिली : अंबादास दानवे
विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे मी आभार मानतो. पक्षाने शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावे, अशी आमची सगळ्यांची भूमिका होती परंतु उद्धवजींनी एका सामान्य सैनिकाला त्यांची जागा सभागृहात दिली. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करून, मला उमदेवारी देण्याचा निर्णय घेतला असे वाटते. मी याआधीही सभागृहात होतो. आता एका गॅपनंतर पुन्हा सभागृहात येतोय, असे अंबादास दानवे म्हणालेत.

अंबादास दानवे दुसर्‍यांदा विधान परिषदेवर
अंबादास दानवे यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेतील फूटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. अंबादास दानवेंना आता दुसर्‍यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !