धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर ; उत्तर महाराष्ट्रातून एकमेव अधिकार्‍याची निवड

उद्या महाराष्ट्रदिनी सन्मानचिन्हासह प्रशस्तीपत्रकाने होणार प्रदान : गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून अधिकार्‍याची ओळख


गणेश वाघ
Dhule Crime Branch Senior Police Inspector Shriram Pawar Awarded Director General of Police’s Commendation Medal ; The Sole Officer Selected from North Maharashtra. भुसावळ (30 एप्रिल 2026) : धुळे जिल्हा पोलीस दलातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मोठाभाऊ पवार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. उद्या शुक्रवार, 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी त्यांना ते मान्यवरांच्या सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी महाराष्ट्र पोलीस दलात चमकदार कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून एकमेव धुळ्यातील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

क्लीष्ट गुन्ह्यांची उकल : गुन्हेगारांचा कर्दनकाळ अधिकारी म्हणून ओळख
धुळे पोलीस दलात वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अधिकारी म्हणून ओळख आहे व या पदाला साजेसे असेच काम त्यांनी आतापर्यंत केले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यासह अनेक पोलीस ठाण्यात सेवा बजावल्यानंतर पवार यांची सुमारे दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेत वर्णी लागल्यानंतर त्यांनी धुळ्याचे तत्कालीन डॅशिंग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत खून, दरोडे, चोर्‍या, घरफोड्या तसेच अन्य विविध प्रकारच्या शेकडो क्लीष्ट गुन्ह्यांची उकल करीत आरोपींना अटक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. धुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही त्यांनी उत्तमरित्या हाताळला आहे. अत्यंत जोखीम व जवाबदारीची खुर्ची असलेल्या पदावर पूर्ण काळ त्यांनी सेवा बजावण्याचे भाग्यही त्यांनाच लाभले आहे.

उत्तर महाराष्ट्रातून एकमेव अधिकारी
गुन्हे शाखेत काम करताना कायदा-सुव्यवस्थे सोबतच सर्वच घटकांशी जिव्हाळ्याशी संबंध जोपासत आपल्या सहकारी कर्मचार्‍यांना सोबत घेवून चालण्याच्या सरळ व सोज्वळ स्वभावामुळे गुन्हे शाखेत श्रीराम पवार यांचा मोठा नावलौकीक आहे. उत्तर महाराष्ट्रात निरीक्षक दर्जात एकमेव श्रीराम पवार यांना पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. त्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !