तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला : उद्या ऑनलाईन लोकार्पण

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश : रुग्णांना मोठा दिलासा


रावेर (30 एप्रिल 2026) : किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण सुविधा आता रावेरमध्ये उपलब्ध होणार आहे. तापी परिसरातील पहिले शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू होत असून, या केंद्राचे लोकार्पण उद्या, गुरुवार, 1 मे (महाराष्ट्र दिन) रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील निवडक आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस सेंटरचे लोकार्पण करण्यात येत असून, त्यामध्ये रावेर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रावेरसह यावल, फैजपूर, मुक्ताईनगर आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी डायलिसिस उपचारासाठी रुग्णांना जळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, प्रवासाचा त्रास आणि आर्थिक भार सहन करावा लागत होता. मात्र आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचे हाल कमी होणार असून, उपचार अधिक सुलभ होणार आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिससाठी मोठा खर्च करावा लागत असताना, शासनमान्य या केंद्रात रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा फायदा होणार आहे.

या संदर्भात आमदार अमोल जावळे म्हणाले, रुग्णांना वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. रावेर येथे डायलिसिस सेंटर सुरू होणे म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना नवसंजीवनी मिळेल, असा मला विश्वास आहे.

उद्याच्या या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक स्तरावर संबंधित अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार असून, शासनाच्या या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे. आमदार जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही सुविधा रावेरला मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !