बच्चू कडूंचे ठरले ; म्हणाले, शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार !


Bachchu Kadu makes his decision; declares, “For the sake of farmers, laborers, and the differently-abled, we will take up Shiv Sena’s ‘Bow and Arrow’ symbol!” मुंबई (30 एप्रिल 2026) : गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असतानाच कालच बच्चू कडू यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यानंतर आता त्यांनी शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर ते विधानसभेवर जातील, हे स्पष्ट असल्याचे चित्र आहे.

काय म्हणाले, माजी मंत्री बच्चू कडू
प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले की, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमी भावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

प्रहार संघटना कायम राहणार
शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू पण त्याबदल्यात आम्हाला शेतकर्‍याची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहिले असेल, तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकर्‍याच्या लढाईत एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल? त्यासाठी माझ्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावणारा आहे, तितकाच माझ्या मजूर, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी धावणार आहे. त्यांच्यासाठी कोणताही समझोता होऊ शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी निक्षूण सांगितले. प्रहार संघटना राहील, ज्याला सामाजिक काम करायचे आहे, त्यासाठी प्रहार राहील.

पुन्हा एकदा ‘घरवापसी’
आम्ही आमच्या राजकीय प्रवासाची शिवसेनेतून सुरुवात केली होती. माझ्या अजूनही बाळासाहेब ठाकरेंना शेतकरी कर्जमाफी संदर्भात लिहिलेले पत्र आहे. कापसाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतकर्‍यांचे आणि दिव्यांगांचे मुद्दे घेऊन आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहोत. हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी, मजूर, वंचित घटकांच्या, दिव्यांगांसाठी कसा कामी येईल? तो उचलण्याचा प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले.

मला मंत्रिपद हवे असते तर
बच्चू कडू म्हणाले की, मला मंत्रीपदाचे काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रीपद हवे असवे तर गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हाच मागितले असते. लोक मंत्रीपदासाठी फिंल्डींग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो, हाच फरक आहे बच्चू कडूचा हे समजून घ्या.

बच्चू कडू म्हणाले, आता जे घडतंय ते माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते, मला काहीच माहिती नव्हती, मी संत्र्याला पाणी देत होतो, तुमच्या बातम्या आल्या सुत्रांनी सांगितले. फोन केला हे केले, इथपर्यंत मी येण्याचे श्रेय मी माध्यमांना देतो, विधान परिषद माझ्या कानावर देखील नव्हती, हे कानावर टाकण्याचे काम माध्यमांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !